अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 15, 2024 09:21 AM
views 185  views

कणकवली : गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात काजू, आंबा, सुपारी यासह तत्सम फळ पिकांचे नुकसान पमोठ्या प्रमाणात झाले असून, नुकसानग्रस्त फळबागांचे तात्काळ पंचनामे होऊन बाधीत शेतकऱ्यांना तातडीने मदत शासनाकडून मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दिवाकर मुरकर. युवक कणकवली तालुका युवक अध्यक्ष नयन गावडे. युवक शहर अध्यक्ष सागर वारंग. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर. महेश चव्हाण. उत्तम तेली. सुजल शेलार आदी उपस्थित होते.

दरवर्षी अशा अवकाळी पावसामुळे व बदलत्या वातावरणामुळे शेतकरी वर्गाला अशा संकटांचा सामना सतत करावा लागत आहे. आणि शासनाकडून अशा शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे, येथील शेतकरी वर्ग आपल्या फळबागांचे उत्पादन मिळण्यासाठी राष्ट्रीय कृत बँक, सहकारी बँक, तसेच विविध वित्तीय संस्था मार्फत कर्ज घेऊन संगोपन करतात, आणि ऐन उत्पन्न हातातोंडाशी आलेले असताना निसर्गाच्या सतत बदलत्या वातावरणामुळे वाया जाते, त्यामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी होऊन बसला आहे.

अनेक शेतक-यांनी विमा एजन्सी मार्फत विम्याचे हप्ते भरून विमा संरक्षण घेतले असून विमा कंपनी कडून सुद्धा शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे, याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करूनही नुकसान ग्रस्त शेतक-यांना मदत दिली जात नाही, दुसरीकडे आंबा काजू पिक संरक्षणाच्या नावाखाली प्रधानमंत्री पीक विमा संरक्षण योजनेखाली असंख्य शेतक-यांनी विमा हप्ते भरलेले होते. पण ठराविक शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसान भरपाई विमा कंपनीकडून देण्यात आली होती, आणि अनेक शेतकरी अजूनही नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. मागील वर्षी शेतकऱ्यांच्या हाती अत्यल्प प्रमाणात उत्पन्न हाती येऊनही अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही,

गेल्या वर्षीच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी तसेच गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे शासनस्तरावरून आदेश व्हावेत, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मागणी करण्यात आली आहे.