
देवगड : देवगड आगारात लवकरात लवकर नवीन गाड्या याव्यात अशी व्यापारी तसेच प्रवासी वर्गाची मागणी असूनदेवगड आगारातील बहुतांशी गाड्या जुन्या झाल्या असून सुमारे ५ ते ६ गाड्या कालबाह्य झाल्याने त्यामुळे त्या ऐवजी नवीन एसटी गाड्या लवकरात लवकर उपलब्ध कराव्यात तसेच बंद असलेल्या लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्या दिवाळी सुट्टीच्या हंगामात पूर्ववत सुरू करण्यात याव्यात अशी मागणी देवगड प्रवासी मित्र व व्यापारी बंधू यांच्या वतीने देवगड आगार व्यवस्थापक यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या सदर्भात आगार व्यवस्थापक.विजयकुमार घोलप यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.दिवाळी पूर्वी काही लांब पल्ल्याच्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात येतील तसेच दिवाळी नंतर पुढील महिन्याभरात देवगड आगारात नवीन परिवर्तन लाल गाड्या उपलब्ध होतील.तसेच देवगड बसस्थानकावर इलेक्ट्रिक गाड्या चार्जिंग सेंटर उभारणी सुरू असून त्या चार्जिंग गाड्याही आगारात दाखल होतील.देवगड नाटे पावस रत्नागिरी पूर्ववत दांडे अनसुरे पुलावरुन सुरू झाली आहे त्यामुळे प्रवाशांची वेळेची व आर्थिक बचत झाली आहे.असेही सांगितले.
देवगड आगारातील बहुतांशी प्रवासी फेऱ्या वरील एसटी बस या जुन्या जीर्ण झाल्याने प्रसंगी स्क्रॅप करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगारातील गाड्यांची संख्या कमी झाली असून याचा परिणाम नियमित प्रवासी फेऱ्या काही अंशी बंद ठेवण्यात आल्या आहेत तर काही विलंबाने सुटतात याचा त्रास प्रवासी वर्गाला सहन करावा लागत आहे.या निवेदनात मागणी करत असताना देवगड आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व प्रवासी फेऱ्यांकरता विशेषतः देवगड पुणे, तुळजापूर ,उमरगा, नालासोपारा ,अक्कलकोट, या प्रवासी फेऱ्याकरीता नव्या एसटी बसची मागणी तात्काळ करण्यात यावी. सुमारे १० परिवर्तन लाल गाड्या देवगड आगारात करिता उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी करीत आहोत.याबरोबरच देवगड बोरीवली मार्गा वरील प्रवासी फेरी वरील गाडी ही वारंवार नादुरुस्त होते व त्यामुळे प्रवाशांना शयनासनी सेवेपासून वंचित रहावे लागते प्रसंगी अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे या मार्गावर ही नव्याने परिवर्तन फेरी सोडण्यात यावी जेणेकरून प्रवाशांना आरक्षण करताना अथवा प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. या मार्गावर नियमित चालक हे थेट न सोडता जम्पिंग चालक देण्यात यावे जेणेकरून प्रवाशांना योग्य सेवा मिळू शकेल या आमच्या आग्रही मागणीचा आपण विचार करावा याबरोबर उपलब्ध माहितीनुसार असे समजते की देवगड आगारात इलेक्ट्रॉनिक बस या दाखल होणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणारा चार्जिंग सेंटरची निर्मिती देखील सुरू आहे. या देखील बसेस देवगड आगारात अधिकाधिक प्रमाणात आणण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करावेत.अशी मागणी करीत आहोत या आग्रही मागणीबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व देवगड तालुक्यातील प्रवासी वर्गाला दर्जेदार सुखद दिलासा द्यावा .त्याचबरोबर या पूर्वी प्रवासी दिनात करण्यात आलेल्या सुचनांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी या शिष्टमंडळात प्रवासी मित्र दयानंद मांगले, व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम,सदस्य आनंद कुळकर्णी, वसीम शहा,नेमिनाथ मांगले यांनी ही मागणी केली आहे.