
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन झालेल्या बोगस रस्ता कामांसह या विभागाचे उपअभियंता धीरज कुमार पिसाळ यांची ही चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदन देऊन माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी अतुल बंगे यांनी केली आहे. दरम्यान २०२३ पासून ते २०२५ पर्यंत तालुक्यात जे रस्ते झाले आहेत त्या सर्व रस्त्यांची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.
निवेदनात श्री बंगे यांनी म्हटले आहे की,कुडाळ सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १ कुडाळ सहाय्यक कार्यकारी अभियंता धीरज कुमार पिसाळ यांनी पिंगुळी ते मठ (वेंगुर्ला) व पिंगुळी ते पाट या दोन रस्त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला असून ही वरील दोन्ही कामे २०२१ मध्ये झालेली असताना पुन्हा २०२३ मध्ये दोन्ही कामांची टेंडर काढून झालेल्या कामांवर पैसे काढून पिगुळी ते मठ रस्त्यावर रक्कम रुपये ९.६८.७४/- एवढी रक्कम हडप करण्यात आली असुन पिंगुळी ते पाट रस्त्यावर रक्कम रुपये २२.८५.१६९/- एवढी रक्कम काढून स्वतः हडप केलेली आहे. ठेकेदार नाम मात्र दाखवून हा भ्रष्टाचार केलेला आहे. ज्या दिवशी कुडाळ सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १ या कार्यालयात धीरज कुमार पिसाळ हे हजर झाले तिथंपासुन कुडाळ तालुक्यातील रस्त्यांच्या कामांबाबत मोठ्या प्रमाणात मलाई खाण्याचा सपाटा लावलेला आहे, म्हणून २०२३ पासून ते २०२५ पर्यंत कुडाळ तालुक्यातील जे रस्ते झालेले आहेत. त्या सर्व रस्त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणीसुद्धा केली आहे.
पाट पिंगुळी आणि पिंगुळी ते मठ या दोन्ही रस्त्यावरील कामांची विशेष चौकशी अधिकारी नेमून चौकशी करण्यात यावी आणि या भ्रष्टाचारी उपअभियंता पिसाळ यांची ही खात्याअंतर्गत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. निवेदनाची प्रत मुख्य अभियंता बांधकाम विभाग रत्नागिरी, कार्यकारी अभियता , सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना दिली आहे










