लाखेवस्तीसाठी घरांची मागणी

मंत्री केसरकरांना निवेदन
Edited by:
Published on: August 05, 2024 12:08 PM
views 191  views

सावंतवाडी : लाखेवस्तीसाठी प्रशासनाने 25 घर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लाखे वस्ती समाज व रासाई कला क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच मंत्री केसरकर यांना सादर केले. 

सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदान नजीक लाखेवस्ती आहे. या वस्तीसाठी मंत्री केसरकर यांच्या प्रयत्नातून नगरपालिकेच्या माध्यमातून पक्की घरे बांधून देण्यात आली होती. या घरातील कुटुंबात सदस्य संख्या वाढल्याने तसेच एका कुटुंबात अन्य कुटुंब वाढल्याने त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था बिकट झाली आहे. शिवाय जी नगरपालिकेच्या माध्यमातून उभारून देण्यात आली होती त्या घरांना गळती लागल्याने घरामध्ये राहणे कठीण झाले आहे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात घरात येत असल्याने त्या ठिकाणी मोठी गैरसोयही निर्माण होते. एकूणच दोन्ही बाबींचा विचार करता लाखीवस्तीमध्ये दिवसेंदिवस राहण्याचा प्रश्न वाढत चालला आहे.

याबाबत लाखे समाज बांधव तसेच रासाई कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे व समाजाचे बांधव सुनील लाखे, संजय खोरागे अंकुश लाखे, रोहित लाखे, नितेश पाटील,सागर लाखे, राम लाखे, साई लाखे, लखन पाटील, पवन पाटील, धीरज लाखे, प्रभू पाटील, विकी लाखे, अविनाश खोरागडे,आदींनी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांचे लक्ष वेधले.यामध्ये त्यांनी लाखेवस्तीसाठी अन्य 25 घरांची मागणी निवेदन द्वारा केली. शिवाय पालिकेच्या मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या जवळही त्यांनी पाठपुरावा केला आहे. आपली ही मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी ही त्यांनी विनंती केली आहे.