
सावंतवाडी : २६ जानेवारी रोजी सकाळी कुडाळ येथे कामावर जात असलेल्या जॉकी फर्नांडिस रा. कारिवडे यांना हुमरस येथे मुख्य रस्त्यावरून जात असताना गवा रेड्याने ठोकर दिली होती. या अपघातात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान नियमांवर बोट ठेवून त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याची बाब मनसेच्या कानावर नातेवाईकांनी घातली होती. याबाबत जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वनसंरक्षक यांची भेट घेवून या कुटुंबाला मदत करण्यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्याची मागणी केली.
दरम्यान, हा प्रस्ताव तात्काळ तयार करून पाठवतो असे आश्वासन वनविभागाच्या वतीने देण्यात आले आहे. वन्य प्राण्याने हल्ला केला असता मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये मदत देण्याची तरतूद आहे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर, शहर अध्यक्ष राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, तालुका सचिव सतीश आकेरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.