
वैभववाडी: डोंगरी धनगर विकास मंडळाने शिराळे गावातील शेळकेवाडी-बोडकेवाडी येथील रस्ता डांबरीकरण आणि पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपच्या तालुकाध्यक्षांकडे केली आहे. या मागणीमुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
डोंगरी धनगर विकास मंडळाने भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिराळे गावातून धनगर वस्तीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरते, ज्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी यांना मोठा त्रास होतो. या रस्त्यावर असलेल्या ओढ्यावर तात्काळ पुलाची आवश्यकता आहे. या पुलाअभावी पावसाळ्यात वाहतुकीची मोठी गैरसोय होते.
या निवेदनाची दखल घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा केली. तसेच, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजप महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, प्रकाश पाटील, मंडळाचे अध्यक्ष मंगेश शेळके, खजिनदार अरुण बोडेकर, सचिव सुनील बोडेकर, सदस्य महेंद्र शेळके, मनोहर शेळके, सुनील कोकरे, बबन बोडेकर आणि जयवंत बोडेकर उपस्थित होते.










