
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात सुरु असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई करावी, या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी येथील तहसील कार्यालयासमोर शिवसेनेने उबाठाने उपोषण छेडले होते. या उपोषणावर तब्बल पाच दिवसांनंतर तोडगा काढण्यास महसूल प्रशासनास यश आल्याने पाचव्या दिवशी ठाकरे शिवसेनेने उपोषण स्थगित केले. मात्र, दिलेल्या आश्वासनानुसार अवैध क्वारीवर कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दिला.
संपुर्ण दोडामार्ग तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननाचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरत चालले आहे. गौण खनिज उत्खनन करणारे दिवसाढवळ्या यंत्रणेला पायदळी तुडवत राजरोसपणे उत्खनन करीत आहेत. अनेक वेळा विविध गंभीर घटना घडत असुन त्याकडे कानाडोळा केला जात आहे. मागील वर्षभरात काळ्या दगडाच्या खाणीत झालेल्या स्फोटांमुळे त्यात काम करणाऱ्या कामगारांचे हात निकामी होणे, कामगारांचा जीव जाणे व अगदी कालपरवा मोर्ले येथील युवकाच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे हे अवैध गौणखनिज उत्खनन माणसाच्या जीवावर बेतत असल्याचे चित्र आहे. हे सर्व घडुनही महसुल यंत्रणा गांधारीच्या भूमिकेत असा आरोप ठाकरे शिवसेनेने केला.
दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे गावातील तिलारी धरण परिसराला लागुन असलेल्या धडम या सामाईक क्षेत्रात तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संगनमताने राजरोसपणे बेकायदेशीर उत्खनन सुरु आहे. हे उत्खनन तिलारी धरणाच्या जलाशयाला लागून करण्यात येत आहे. या खाणीसाठी आवश्यक असणारे कोणतेही परवाने घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ही खाण पूर्णत बेकायदेशीर असून त्यावर महसूलच्या अधिकाऱ्यांनी डोळे बंद करून घेतले आहे. येथील क्वाॅरीत रोज होणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे तिलारी धरणालाही धोका संभवतो. त्याचप्रमाणे तिलारी मुख्य धरणाच्या खालच्या बाजुस तिलारी नदी शेजारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कृपाशिर्वादाने बेकायदेशीरपणे स्टोन क्रशर सुरु असून शिरंगे येथील धडम या क्षेत्रातून आणला जाणारा काळा दगड येथे फोडला जातो. या क्रशर युनिटला आवश्यक असणारे कोणतेही परवाने घेण्यात आलेले नाहीत. या क्रशरना बेकायदेशीरपणे वीज कनेक्शनही घेण्यात आलेले आहे. साधारणपणे दोन वर्षांपुर्वी या तिलारी धरण परीसरात आढळून आलेला व महसुल विभागाने पंचनामा केलेला काळ्या दगडाचा साठाही तिलारी धरण प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संगनमताने या क्रशरवर फोडून लंपास करण्यात आलेला आहे. त्यामुळे याप्रकरणी कर्तव्यात कसूर करत शासनाचा कोट्यावधीचा महसुल बुडविण्यास हातभार लावणारे मंडळ अधिकारी, संबंधित तलाठी, तिलारी प्रकल्प अधिकारी व वीज वितरणचे अधिकारी यांचेवर उचित कारवाई होणे गरजेचे आहे. अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा शिवसेनेने (उबाठा गट) निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला होता. मात्र, महसूल प्रशासनाने यावर कोणताही तोडगा न काढल्याने ठाकरे शिवसेनेने प्रजासत्ताक दिनी येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली. हे उपोषण पाचव्या दिवशीही सुरू होते. या उपोषणात तालुकाप्रमुख संजय गवस, महिला जिल्हा उपसंघटक विनिता घाडी, पंचायत समिती माजी उपसभापती लक्ष्मण नाईक, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, तालुका उपसंघटक संदेश वरक, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, उपोषण मागे घेण्याची विनंती तहसीलदार अमोल पवार यांनी उपोषणकर्त्यांकडे केली होती. मात्र, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही या भूमिकेवर उपोषणकर्ते ठाम राहिल्याने पाचव्या दिवशीही उपोषण सुरू होते. अखेर तहसीलदार यांनी आयनोडे येथे काळ्या दगडाचा मोठा साठा आढळून आला आहे. त्याबाबत देण्यात आलेली परवानगी व इतर कागदपत्रे २४ तासांच्या आत तहसील कार्यालयात सादर करावीत, अन्यथा नियमानुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल असे तिलारी पाटबंधारे प्रकल्प विभागास दिल्याचे आश्वासन पत्र दिल्याने गुरुवारी दुपारच्या सुमारास हे उपोषण स्थगित करण्यात आले. प्रशासनाने यावर कारवाई न केल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दिला. यावेळी परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, कार्यकारी अभियंता विनायक जाधव उपस्थित होते.