दारू - अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: July 11, 2024 14:19 PM
views 68  views

सावंतवाडी : सार्वजनिक, रहदारीच्या मार्गावर आणि शाळांच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने पार्किंग करून ठेवली जात असल्याने वाहतूकीची कोंडी होत आहे. तसेच शहरातील शाळांच्या जवळपास दारू, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर सभा आयोजित केली होती.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सावंतवाडी व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर, पत्रकार सिताराम गावडे, सामाजिक कार्यकर्ते अँड नकुल पार्सेकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, सामाजिक कार्यकर्ते तौकीर शेख, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, रफिक मेमन, बाळासाहेब बोर्डेकर, ऑगोस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते. सावंतवाडी शांतताप्रिय, सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी प्रत्येक सण उत्साहात व शांततेत साजरा केला जातो असे उपस्थितांनी सांगितले. यावेळी सोशल मीडियावर लक्ष ठेवावे लागेल. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा उपद्व्याप सोशल मीडियावर कोणी करत असेल तर लक्ष ठेवून कारवाई करावी लागेल असे सुचविण्यात आले.

सावंतवाडी शहरात नगरपरिषद ते आरपीडी हायस्कूल च्या पुढे बॅके पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग होत असल्याने एसटी बस मार्गावरून जाताना अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी महाविद्यालय, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना त्रास, अडथळा निर्माण होतो. बस स्टॉप असलेल्या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होते. तसेच मिलाग्रीस हायस्कूल भरताना व सुटताना वाहतूक कोंडी होते. जयप्रकाश, गांधी चौकात वाहतूक कोंडी होते. यावर रस्ता मार्ग मोकळा होईल असे पाहावे असे उपस्थित सदस्यांनी सुचवले. सावंतवाडी शहरात शाळांच्या जवळपास दारू, अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे बोलले जात आहे,ते अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करावी. अवैध धंदे बंद करून भावी पिढीचे संरक्षण करावे. याबाबत चर्चा होवून पोलिस निरीक्षक यांनी लक्ष घालावे असे सुचविण्यात आले. 

यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण म्हणाले, मी कालच पदभार स्वीकारला आहे. आपल्या सुचनांचे कारवाईत रूपांतर करण्यासाठी प्राधान्य देईन. आंबोली पावसाळी पर्यटनस्थळी लक्ष दिला जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी खबरदारी घेतली जाईल.