
सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटी तर्फे “डिफेन्स करिअरमधील संधी आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा” या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आज पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भोसले नॉलेज सिटीचे सीईओ लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) रत्नेश सिन्हा उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, संरक्षण दलातील सेवा ही केवळ प्रतिष्ठेची नाही, तर देशसेवेचीही सुवर्णसंधी आहे. सैन्यात अधिकारी म्हणून प्रवेश मिळवण्यासाठी कोणकोणत्या परीक्षा व प्रक्रिया आहेत, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
सैनिक स्कूल ही संरक्षण दलात अधिकारी बनण्याच्या प्रवासातील पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. सैनिकी शाळा विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त, समर्पण आणि त्यागाची भावना निर्माण करतात. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. सध्या देशभरात ३३ सैनिक स्कूल कार्यरत असून, केंद्र शासनाच्या नव्या योजनेनुसार पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर आणखी १०० सैनिक स्कूल स्थापन करण्याची योजना आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स परीक्षा देऊन देशसेवेच्या मार्गावर वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सैनिक स्कूल प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर असून पालकांनी वेळेत अर्ज भरावेत असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे अधिकारी उमेश आईर, मिलिटरी बॉईज हॉस्टेलचे अधीक्षक रवींद्र कारंडे, माजी सैनिक धनंजय राऊळ, आजी-माजी सैनिकांचे परिवार तसेच भोसले नॉलेज सिटीचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये डिफेन्स करिअर व सैनिक स्कूल विषयी जागरूकता वाढली. भविष्यात अनेक विद्यार्थी देशसेवेच्या मार्गाकडे वळतील असा विश्वासही उपस्थितांमधून व्यक्त केला गेला.