सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या सचिवपदी दीपक पटेकर

Edited by: विनायक गांवस
Published on: July 05, 2024 12:56 PM
views 459  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जानेवारी २०२३ मध्ये स्थापन झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये तालुका संघटना कार्यन्वीत झाल्या आहेत. जिल्हा वीज ग्राहक संघटना वीज ग्राहकांच्या हक्कासाठी मेळावे, आंदोलने, उपोषण, जनता दरबार आयोजित करून लढा देत आहे. जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने कुडाळ येथे ४ जुलै रोजी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जिल्हा सचिव निखिल नाईक यांनी तांत्रिक अडचणींमुळे सचिव पदाचा राजीनामा दिल्याने जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले सावंतवाडीचे दीपक पटेकर यांची जिल्हा सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

दीपक पटेकर यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत असताना सावंतवाडी, दोडामार्ग आदी तालुक्यांमध्ये वीज ग्राहक संघटना मजबूत करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. सावंतवाडी तालुक्यामध्ये वीज ग्राहक संघटनेचे कार्य लोकांपर्यंत नेताना आपल्या हक्कासाठी वीज ग्राहकांनी जागृत व्हावे यासाठी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, समन्वयक गणेश बोर्डेकर आदी कार्यकारिणीच्या सहकार्याने अनेक गावांमध्ये बैठका घेत जनजागृती केली.

वीज ग्राहकांच्या समस्या निवारण्यासाठी अनेकदा वीज अधिकाऱ्यांना भेटून वीज समस्या मार्गी लावण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. जिल्हा संघटनेत त्यांनी वर्षभर दिलेल्या योगदानामुळे त्यांच्यावर जिल्हा सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, राजेश राजाध्यक्ष, व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, कुडाळच्या नगराध्यक्षा आफ्रीन करोल, सचिव निखिल नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.