
सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सावंतवाडीत येत आहेत. सावंतवाडीत येण्यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंना धक्का दिला आहे. उबाठा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, संतोष गोवेकर यांच्यासह तब्बल ४०० जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला. ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, संतोष गोवेकर, संदीप कोठावळे, कौस्तुभ गावडे आदींसह ४०० जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बाळा गावडे म्हणाले, उबाठा शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं. मात्र, तिकीट वाटप करताना डावललं गेलं. राजन तेलींना उमेदवारी दिली गेली. यावेळी तेलींच काम करणार नाही असा पवित्रा मी घेत शांत बसलो होतो. राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, गेली अनेक वर्षे राजकारणात घेतलेल्या मेहनतीचा फायदा जनतेला व्हावा या हेतूने आज शिवसेनेत प्रवेश करत आहे. आमचे गुरुवर्य शंकर कांबळी, दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करणार असून तेलींना पाडणार अन् वचपा काढणारच असा निर्धार श्री. गावडेंनी केला.
दरम्यान, माजी आमदार शंकर कांबळी म्हणाले, पंचतारांकित हॉटेलच भुमिपूजन करताना दीपक केसरकर यांनी गेली २५ वर्ष प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. शेतकऱ्यांना ६० कोटी अधिकचा मोबदला देण्याचे कबुल केलं असून आचारसंहितेनंतर तो म्हणाला मिळेलच. मोठा भाऊ म्हणून माझे आशीर्वाद केसरकर यांना असून ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर म्हणाले, बाळा गावडे आणि त्यांचे सहकारी शिवसेनेत आल्यामुळे आमची ताकद वाढली आहे. त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक देखील लढवली असून ३० हजारहून अधिक मते मिळवली होती. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य तसेच पक्षाचे जिल्हास्तरावर काम त्यांनी केल आहे. त्यांच्या अनुभवाचा निश्चित आम्हाला फायदा होईल असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सुनील दुबळे आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी आभार मानत दीपक केसरकर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.