दीपक केसरकरांचा कॉग्रेसला धक्का

कॉग्रेस, उबाठा समर्थकांच्या हाती 'शिवधनुष्य'
Edited by: विनायक गांवस
Published on: November 14, 2024 12:58 PM
views 457  views

सावंतवाडी : तळकोकणात महायुतीचे उमेदवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कॉग्रेसला मोठा धक्का दिला आहे. कॉग्रेसचे पदाधिकारी, वेंगुर्ला माजी पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब यांनी हाती शिवधनुष्य घेतले आहे. त्यांच्यासह कॉग्रेस व उबाठा शिवसेनेतील १०० सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला. काँग्रेसचे पंचायत समिती माजी उपसभापती सिद्धेश परब, शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य सौ.अनिषा गोडकर, पांडुरंग नाईक, आरवली माजी उपसरपंच मयूर आरोलकर आदींसह १०० हून अधिक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला.  यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवराज लखमराजे भोंसले, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, शिवसेना नेते बाळा गावडे, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, परिक्षित मांजरेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी उपसभापती सिद्धेश परब म्हणाले, कॉग्रेसच्या संघटनेत आम्ही काम केलं. आमच्या पक्षाचा उमेदवार असावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मात्र, उबाठा शिवसेना सोबत आल्यानंतर आमच्यावर अन्याय झाला. कोकणात एकही उमेदवार कॉग्रेस पक्षाला दिला नाही. सावंतवाडीत उमेदवार असताना देखील 'फिरता चषक' राजन तेलींना प्रवेश देऊन महाविकास आघाडीची उमेदवारी दिली. संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने आम्ही नाराज होतो. म्हणून, आज दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आम्ही शिवसेनेत प्रवेश केला. निकालाच्या दिवशी आमची ताकद दिसून येईल रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ दीपक केसरकर यांच्या पाठीशी उभा असून सर्वांधिक मताधिक्य इथून देऊ असा विश्वास श्री. परब यांनी व्यक्त केला. तसेच केसरकर यांच्यावर आमचा विश्वास असून ते निश्चितच राहीलेली विकास काम पूर्ण करतील. स्थानिक आमदार सोबत असल्याने जनतेची सर्व कामे आम्ही मार्गी लावू. राजन तेलींसारखा विरोध करायचा आणि नंतर भुमिपूजनाला मांडीला मांडी लावून बसायचं अशी आमची भूमिका नाही असंही त्यांनी सांगितलं.

 यावेळी दीपक केसरकर म्हणाले, काँग्रेसचे सिद्धेश परब यांनी पक्षात प्रवेश केल्याने आमची ताकद आणखीन वाढली आहे. महायुतीचे राज्यात चांगलं काम सुरू आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही चालत आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत असून लोकहीताच काम करत आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीला मोठं यश मिळेल. याच जोरावर शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. युती सरकारमुळे मतदारसंघातील जनतेची सर्व काम पूर्णत्वास येत आहेत. सरकारच्या विकासात्मक योजना तळागाळापर्यंत पोहचत आहे.‌ फाईव्ह स्टार हॉटेल देखील मतदारसंघात सुरू झालं आहे. पुढील काळात सर्वांच्या सोबतीन सर्वांगीण विकास साधणार असल्याचे विधान श्री. केसरकर यांनी केले.