नारायण राणे, रविंद्र चव्हाण माझ्यासोबत ; विजयाचा चौकार निश्चित

अनिष्ठ प्रवृत्ती सावंतवाडीत नको : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: October 23, 2024 11:29 AM
views 351  views

सावंतवाडी : मी साईबाबांचा भक्त आहे.‌‌ जे घडत ते त्यांच्या आशीर्वादाने घडतं. त्यामुळे यावेळीही चांगलंच घडेल. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे यांच्यासारखे दिग्गज नेते माझ्यासोबत आहे. ही मंडळी जेव्हा सोबत असतात तेव्हा विजयाची निश्चित खात्री असते असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त करत विजयी चौकार मारणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसमोर उभं राहिलं की आपलं नाव महाराष्ट्रात होत यामुळे अनेकजण मतदारसंघातून इच्छुक असतात असा टोलाही विरोधकांना हाणला.

दीपक केसरकर म्हणाले,. इथल्या लोकांच्या हितासाठी माझी नेहमी लढाई असते. अनिष्ठ प्रवृत्तींनी सावंतवाडीत प्रवेश करू नये असं मला व‌ इथल्या लोकांनाही वाटतं. विकासकाम मोठ्या प्रमाणात महायुती सरकारने केली आहेत. कोट्यावधीचा निधी गावागावात दिला आहे. जनतेच प्रेम माझ्यासोबत आहे. त्यातून उतराई होण्यासाठी अनेक योजना मी मंजूर करून घेतल्या. तिलारीत २६० एकरमध्ये पर्यटन प्रकल्प होत आहे.  १०० कोटीचा पाणबुडी प्रकल्प वेंगुर्लेत होत आहे. फिशिंग व्हिलेज पहिल्यांदा होत आहे. टसर सिल्क, हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड दोडामार्ग येथे होत आहे. काजू प्रक्रियेसाठी ब्राझिलसह आपला करार झाला आहे. मोठ्या रोजगारासाठी पहिल्या टप्प्यात १०० मुलं जर्मनीला जात आहेत. ज्यावेळी हा आकडा वाढेल त्यावेळी जिल्ह्याच चित्र वेगळं असणार आहे. आपल्या मुलांमध्ये ती ताकद आहे. केवळ टीका करण्याचे काम काहीजण करत आहेत. या मतदारसंघात शासकीय इमारती, हॉस्पिटल, क्रिडा संकुल नव्यानं उभारली आहेत. हे सगळं करताना मेहनत घ्यावी लागते. शिक्षणमंत्री म्हणून २५ वर्षांत झालं नाही ते केलं. ६६ हजार शिक्षकांचा प्रश्न सोडवला. ३० हजार शिक्षकांना नव्यानं भरती केल. केंद्रप्रमुख नेमणूक, संपूर्ण मोफत गणवेश विद्यार्थांना दिला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. मराठी भाषा भवन मुंबईत उभ राहत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न मी केला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, सिंधुदुर्गचा कायापालट करण्यासाठी यावेळी निवडणूकीस सामोरं जात आहे. येथील जनतेच हित व्हावे हाच उद्देश आहे. शिवरामराजे भोसले, भाईसाहेब सावंत, प्रतापराव भोसले, जयानंद मठकर, प्रवीण भोसले, शिवराम दळवी, आदींनी या भागाच प्रतिनिधित्व केलं. लोकांसाठी काम करण्याची आमची एक परंपरा राहीली आहे‌. कोणीही स्वतःचा स्वार्थ बघितला नाही. ती परंपरा असलेल्या लोकांच्या हाती पुढची टर्म सोपविणार आहे‌. हा मतदारसंघ महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असेल असा विकास इथे होत आहे. आजच्या युवा सेनेच्या मेळाव्यात असणारी गर्दी बघता निलेश राणेंच्या प्रवेशानंतर शिवसेनेची ताकद अधिक वाढलेली असेल यात शंका नाही. ज्यावेळी महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, आरपीआय आम्ही दिसू तेव्हा आमची खरी शक्ती दिसून येईल. ही वज्रमूठ लोकांना सुखी करेल, जिल्ह्याला भवितव्याच्या दिशेने घेऊन जाईल असे विधान मंत्री केसरकर यांनी केले.