
- बॅनर फाडल्याचीही चर्चा
सावंतवाडी: दोडामार्ग, वेंगुर्ले नंतर आता सावंतवाडी शहरात मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनर झळकलेत. ''आता बदल हवो तर आमदार नवो !'' अशा आशयाचे हे बॅनर शहरात अज्ञाताकडून लावण्यात आलेत. त्यात यातील काही बॅनर फाडून काढून टाकल्याचीही जोरदार चर्चा शहरातील चौकाचौकात आहे. तर बॅनरच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार बदलण्याचे आवाहन करणारा हा 'बॅनर बाबा' कोण ? याचीही चर्चा आहे.
सध्या सोशल मीडियावर लड्डू मुत्त्या बाबांची चर्चा आहे. हे बाबा म्हणे फिरता पंखा हातांनी थांबवतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. अशात सावंतवाडी शहरात मात्र भलत्याच बाबांची चर्चा रंगली आहेत. हे आहेत 'बॅनर बाबा'. हे बॅनर बाबा निनावी बॅनर लावून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागतात. परंतु, हे बॅनर बाबा कोण ? असाच सवाल नागरिकांना पडला आहे.
दोडामार्ग, वेंगुर्लेनंतर बुधवारी सकाळी सावंतवाडी शहरात झळकलेले बॅनर 'चाय पे चर्चे'चा मुद्दा ठरले. मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अज्ञाताकडून हे बॅनर लावले. मालवणी भाषेत या बॅनरवरचा मजकूर असून केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे त्यात लिहिले गेले आहे. ''भाईनू, आम्ही सावंतवाडीकर तुमका आपले समजा होतो. पण दर येळाक आमच्या भावनांची खेळ केलास मवो. इकास, इकास आणि इकास....पंधरा वर्षा निस्ते कडकडतहास. पण भाईनू, मोती तलावाकडे ४ दिवे लावलास म्हणजे इकास नाय ओ !'' अशा आशयाचे हे बॅनर तलावकाठासह शहरात लावले गेलेत. शहरात या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. तर काही ठिकाणचे बॅनर फाडून काढल्याचीही माहिती समोर येत आहे. उर्वरित बॅनरवर नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असून शहरात मात्र या 'बॅनर बाबा'ची चांगलीच चर्चा रंगली आहे.
'आता बदल हवो तर आमदार नवो !' अशीही साद या बॅनरवरून घातली गेली आहे. आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता असून सावंतवाडी मतदारसंघात नारायण राणेंच्या विधानानुसार भाजपातून डझनभर, शिवसेनेतून केसरकर तर उबाठा शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून अर्धा डझन उमेदवार ''बाशिंगाला गुडघे'' बांधून तयारीत असल्याचे चित्र आहे. त्यात निनावी बॅनर आणि आमदार बदलण्याचे आवाहन बघता दीड डझन इच्छुकांतील पत्ते कट होणारे कोणत्या बॅनरखाली दिसणार ? अशी एकच चर्चा सुरू आहे.