
सावंतवाडी : तळवडे ग्रामपंचायतीत तब्बल ७२ लाख ८६ हजांरांचा घोटाळा करण्यात आला असून सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदारांना अदृश्य शक्तीकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला. स्थानिक आमदार दीपक केसरकर हे छुप्या पद्धतीने मदत करत होते असा गंभीर आरोप भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी केला आहे. तर 'जनता दरबारा'त ग्रामसेवक, सरपंच व तिनं ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. त्यामुळे आज तक्रारदारांना विजय मिळाला आहे. घोटाळा करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून नियोजित भ्रष्टाचार केला गेला असं मत श्री गावडे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, अनेक चांगले ग्रामसेवक जिल्ह्यात होऊन गेले. त्यांला काळीमा फासणारी ही घटना आहे. ७२ लाख ८६ हजांरांचा घोटाळा करण्यात आला असून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रशासनाला आदेश देत फौजदारी गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदारांना आज विजय मिळाला आहे असं मत संदीप गावडे यांनी व्यक्त केले. तर भाजपची ग्रामपंचायत असणाऱ्या ठिकाणी केसरकरांकडून त्रास देण्याचे प्रयत्न होत असल्याचंही ते म्हणाले. तसेच दीपक केसरकर यांनी विशिष्ट बदनामीची मोहीम हे केलेल विधान म्हणजे कातडी बचावण्याचा प्रकार आहे असं मत व्यक्त केले.
दरम्यान, तळवडे ग्रामपंचायतीचा अपहार झाल्याची बातमी निदर्शनास आणून पुरावे सादर केले होते. पालकमंत्री व प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली होती. यानंतर समिती गठीत करून आमच्याकडील पुरावे घेऊन, प्रत्यक्ष पहाणी केली. त्यानंतर अहवाल सादर केला. मात्र, दोषींवर कारवाई होताना धिम्या गतीनं कार्यवाही होत होती. जनता दरबारात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची आम्ही भेट घेतली. त्यावेळी गाव दहा वर्षे मागे गेल्यानं दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यासाठी संदीप गावडे यांनी मेहनत घेतली. त्यानंतर पोलिस विभागाने सरपंच, ग्रामसेवक व तिनं ठेकेदारांवर कारवाई झाली आहे. ७२ लाख ८६ हजारांचा हा अपहार नसून सव्वा कोटीच्या पुढे हा भ्रष्टाचार जाईल असा आरोप ग्रामपंचायत सदस्य दादा परब यांनी केला. तर सरपंचाच नाव यातुन वगळण्यासाठी अदृश्य शक्ती कार्यरत होती. या गोष्टी चुकीच्या आहेत. आर्थिक अपहाराचे गुन्हे ग्रामसेवकांवरही आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मुळे कारवाई होऊ शकली यासाठी त्यांचे आभार मानतो. आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली व संदीप गावडे यांचेही श्री परब यांनी आभार मानले. यावेळी भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, दादा परब, मंगलदास पेडणेकर, सुरेश मांजरेकर, नम्रता गावडे, स्मिता परब आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.