
वेंगुर्ला : शंभरहून अधिक वर्षाचे केवळ पावसाळी पाण्याचा निचरा होणारे पूर्वपार मार्ग कायमस्वरूपी पूर्ववत खुले करून मिळणेबाबत शिरोडा बाजारपेठ येथील कापाना गल्लीच्या रहिवाश्यांनी शालेय शिक्षण मंत्री यांची भेट घेत या प्रश्नी लक्ष वेधले होते. तसेच याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. याप्रश्नी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत येथील पाणी जाण्याचे मार्ग खुले करून येथील रहिवाश्यांना होणारा त्रास दूर करण्याचे आदेश दिले होते.
यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी गटविकास अधिकारी व शिरोडा ग्रामपंचायत यांना तात्काळ कार्यवाही बाबत आदेश दिले आहेत. यामुळे कापाना गल्लीतील रहिवाशांनी उद्या १५ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण मागे घेतले आहे. याबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर व शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने हा विषय मार्गी लागला आहे.
याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, शिरोडा कापाना गल्ली येथे पावसाळी पाण्याचा निचरा होणारे नैसर्गिक आणि पूर्वपार मार्ग अडवल्याने पावसाळी पाण्याचा नेहमीसारखा योग्य निचरा होत नसल्याबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांजकडे तक्रार प्राप्त झाली आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जि. सिंधुदुर्ग यांजकडून याबाबत या कार्यालयाकडे तात्काळ उचित कार्यवाही करणेयायत निर्देश आलेले आहेत. यानुसार शिरोडा कापाना गल्ली येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) आाणि प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व गट विकास अधिकारी पंचायत समिती वेंगुर्ला यांनी समक्ष पहाणी करून शिरोडा बाजारपेठ कापाना गल्ली येथे पावसाळी पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी करायच्या उपाययोजनेबाबत आपणास आवश्यक सूचना दिलेल्या आहेत.
याबाबत सरपंच ग्रामपंचायत शिरोडा यांनी आवश्यक कामाचे सर्वेक्षण करून, कापाना गल्ली येथे भूमिगत गटाराचे काम सुरू करण्याबाबत तातडीने नियोनन करण्यात यावे. जेणेकरून भविष्यात कापाना गल्ली येथील नागरीकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरून नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही तसेच पाणी साचून रोगराई पसरून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. आपणाकडून याबाबत उचित कार्यवाही न झाल्यास व भविष्यात पावसाळी पाणी साचल्याने धोका निर्माण झाल्यास आपणावर आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ नुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, तसेच आपण सदरचा विषय गांभिर्याने घेऊन कापामा गल्ली येथे भूमिगत गटाराबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणेसाठी प्राधान्याने सदरचे काम करावे, याबाबतची कार्यवाही आपण विहित कालावधीत पूर्ण न केल्यास अथवा दिरंगाई केल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३८ मधील तरतूदीनुसार कर्तव्यात कसूरी केल्याने आपणावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे सक्त आदेश शिरोडा ग्रामपंचायतला दिले आहेत.