
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात भात पिक हे प्रमुख पीक असून सातत्याने मे महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे भात पेरणी रखडली आहे. आता जमिनीतील आद्रता कमी झाल्यामुळे भात पेरणी करून ते भात लावणी योग्य येणे कठीण आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून शेतकऱ्यांची वर्षभराची रोजी रोटी यामुळे हिरावली जाणार आहे. या बाबत नुकत्याच झालेल्या आपत्ती व्यवस्थापन च्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेण्याची आवश्यकता होती. मात्र ती घेतलेली दिसत नाही. आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग सह कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून करण्याची गरज होती. मात्र तसे झालेले दिसत नाही अशी टीका करत विरोधी पक्ष म्हणून कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व शिष्ट मंडळाने मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदारांकडे निवेदन देत केली आहे.
यावेळी श्री नाईक यांनी म्हटले सातत्याने पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची नुकसान झाले असून इ-पीक पाहणी करून गतवर्षी केलेल्या शेतकऱ्यांचा आढावा घेत या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देय करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, राजू राठोड, राजू शेट्ये, धीरज मेस्त्री, महेश कोदे, प्रदीप सावंत, रोहित राणे, प्रतीक रासम, अजित काणेकर, आशिष मेस्त्री,आदित्य पालव, वेदांत शिवगण आदी उपस्थित होते.