सावंतवाडी - दोडामार्ग 'तो' पट्टा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित करा

न्यायालयाचे सरकारला आदेश
Edited by: विनायक गांवस
Published on: April 15, 2024 08:48 AM
views 632  views

▪️सिंधुदुर्गसाठी हा मोठा विजय : स्टॅलिन डी.

▪️एकोटुरिझमवर हा पट्टा श्रीमंत होईल : डॉ. जयेंद्र परुळेकर 

▪️पट्टेरी वाघांसोबत पर्यटनाची संधी : संदीप सावंत 


सावंतवाडी : १४ वर्ष जो लढा वन्यजीव, जंगल वाचविण्यासाठी लढला त्याला अखेर यश मिळालं आहे. वन्यजीव व वनसंपदेच्या रक्षण व जतनासाठी सावंतवाडी-दोडामार्ग हरित पट्ट्याला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ईकोसेंसिटीव्ह) घोषित करण्याचा महत्त्वाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिला आहे. आमच्या लढ्याचा शेवटी यश मिळालं असून सिंधुदुर्गसाठी हा मोठा विजय आहे असं मत वनशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष स्टॅलिन दयानंद यांनी व्यक्त केलं.‌ सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


स्टॅलिन डी म्हणाले, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्यजीव व वनसंपदेच्या रक्षण व जतनासाठी महत्त्वाच्या असलेल्या सावंतवाडी-दोडामार्ग हरित पट्ट्याला (कॉरिडोर) पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ईएसए) घोषित करण्याचा महत्त्वाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिला आहे. याबाबत अंतिम अधिसूचना जारी करण्याबाबत विशिष्ट कालावधी घालून देतानाच तोपर्यंत झाडे तोडणे, कापण्यावर बंदी कायम राहणार असल्याचे तसेच बंदीचे पालन होण्याची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, वन उपसंरक्षक व सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांवर असल्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. 


पर्यावरण प्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर म्हणाले, १४ वर्षांची ग्रामस्थांची लढाई यशस्वी झाली आहे. न्यायालयात ऐतिहासिक विजय त्याला मिळाला आहे. माधव गाडगीळ अहवालात ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व गोष्टी होत्या. परंतू, त्यानंतरचा अहवाल ५०० मीटरवरून करण्यात आला. या अहवालात अख्खं दोडामार्ग वगळले गेलं. जिथे वनश्री आहे तेच वगळून टाकलं. मात्र, उच्च न्यायालयान सावंतवाडी, दोडामार्गमधील २५ गाव एकोसेंन्सीटीव्ह जाहीर करण्यास सांगितली आहेत. वनसंज्ञा लागली म्हणजे काहीच होणार नाही ही फसवणूक आहे. एकोटुरिझमवर हा पट्टा श्रीमंत होईल, निसर्गाला जपून विकास होईल. हरित प्रकल्पाला आमचा पाठिंबा राहील. प्रदुषणकारी प्रकल्प आम्हाला नकोत असं डॉ. परूळेकर म्हणाले.

तर पांचगणी, महाबळेश्वरला वाघ नाहीत. पण, आपल्या पट्ट्यात पट्टेरी वाघ आहेत‌. या वाघांसोबत आम्ही राहतो. त्यांच्यासह पर्यटन करण्याची संधी न्यायालयान आम्हाला दिली आहे. पर्यावरण, जंगल वाचवून तरूण पिढीने कोकणचा कॅलिफोर्निया करावा. त्याची पहिली सुरूवात झाली आहे. विनाशकारी प्रकल्पांना थारा देऊ नये. शाश्वत विकास साधावा असे आवाहन संदीप सावंत यांनी केलं.

याप्रसंगी वनशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष स्टॅलिन दयानंद, पर्यावरण प्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत, डॉ सतिश लळीत, नंदकुमार पवार आदींसह दोडामार्ग, सावंतवाडी भागातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.