
संगमेश्वर : तालुक्यातील छत्रपती संभाजी नगर येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवेदने, अर्ज, निवेदनपत्रे देऊनही रस्ता दुरुस्तीकडे कोणतीही दखल न घेतल्यामुळे येत्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा, अवघ्या ५०० ते ६०० मीटर लांबीचा हा रस्ता आजही लाल मातीचा कच्चा असून त्यात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. पावसात वाहून गेलेल्या दगडांमुळे रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या मार्गावरून वाहनाने किंवा पायी चालणेही अवघड आहे.
संभाजी नगरमध्ये सुमारे ५०० हून अधिक लोकवस्ती आहे. याच वस्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह असून येथे ५० ते ६० विद्यार्थी राहतात. या रस्त्याशिवाय अन्य पर्यायी मार्ग नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह शाळकरी मुले, रुग्ण, वयोवृद्ध यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संभाजी नगरमध्ये जवळपास ५०० मतदार आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पक्ष नेते व स्थानिक पुढारी रस्ता होईल अशी आश्वासने देतात, मात्र गेल्या ५०-६० वर्षांत प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही. यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात पावसामुळे रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन करताना देखील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे लागले.
संभाजी नगर रस्ता दुरुस्त करावा, अडथळे दूर करावेत, अन्यथा जबाबदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे स्पष्ट आदेश प्रांताधिकारी, रत्नागिरी यांनी दिले होते. हे आदेश नावडी ग्रामपंचायत आणि संगमेश्वर पोलिसांनी दुर्लक्षित केले. परिणामी शासन यंत्रणेवर ग्रामस्थांत तीव्र नाराजी आहे. रस्ता असुविधेमुळे ग्रामस्थांनी एकमुखाने ठराव करून ,रस्ता पक्का झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधी आणि शासनाकडून मिळणाऱ्या निव्वळ आश्वासनांना आता फसणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार अटळ आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर, शासन आणि प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा रोष आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे.