दुर्दैवी..! | अंगावर माड पडून युवकाचा मृत्यू

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 07, 2025 19:21 PM
views 813  views

कणकवली : माड तोडत असताना तो मधोमध तुटून अंगावर पडल्याने कल्पेश दत्तात्रय नाडकर्णी (वय ३५, रा. तोंडवली या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तोंडवली येथेच गुरुवारी सायंकाळी ६.३० वा. सुमारास घडली.

कल्पेश हा आपले चुलते पद्माकर नाडकर्णी यांच्यासमवेत एका शेजाऱ्याचा सुकलेला माड कटर मशीन व दोरीच्या सहाय्याने तोडत होते. माड तोडत असतानाच अचानक मधोमध तुटला व तो थेट कल्पेश याच्या डोक्यावर‌ पडला. यामध्ये कल्पेश याच्या डोक्याला, उजव्या दंडाला गंभीर दुखापत झाली. 

कल्पेश याला सुरुवातीला कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी त्याला गोवा - बांबोळी येथे नेले जात होते. पण वाटेत, रात्री ९.३० वा. सुमारास कल्पेश याच्या शरीराची हालचाल होईनाशी झाली. त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता कल्पेश याचा मृत्यू झाला होता. याबाबत पद्माकर यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.