
सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे येथे एका ५१ वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अर्जुन बाळा राऊळ असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते अविवाहित होते. त्यांचे निधन आजारपणामुळे झाले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नेमळे-फौजदारवाडी येथील रहिवासी असलेले सखाराम दशरथ परब यांनी त्यांचे मामा अर्जुन राऊळ यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली. गेल्या काही वर्षांपासून अर्जुन राऊळ हे त्यांच्या मूळ घरात न राहता एका छोट्या घरात एकटेच राहत होते. त्यांना किडनीचा आजारही होता. सुमारे महिन्याभरापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा आणि मृतदेह घरात पडून राहिल्याने कुत्रे व इतर प्राण्यांनी तो खाल्ला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे करत आहेत.