रानबाबुळीत आराम बस मोटर सायकल अपघातात तरुण ठार

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 08, 2025 18:24 PM
views 190  views

सिंधुदुर्गनगरी : मालवण कसाल या रस्त्यावर रानबाबुळी येथे आराम बस आणि मोटरसायकल यामध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार गणेश चंद्रकांत घोगळे राहणार वराड तालुका मालवण  हा 28 वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर त्याच्यामागे बसलेली तरुणी जखमी झाली आहे. 

मालवण कसाल या रस्त्यावर मालवणहून मुंबईच्या दिशेने जाणारी आराम बस क्रमांक एम पी 41 झेड जे ७४१० ही रानबांबुळी फाट्या जवळील अवघड वळणावर आली असता समोरून कसाल वरून वराडच्या दिशेला जाणारी सुझुकी जिक्सर मोटरसायकल क्रमांक एम एच ०७ एटी 88 78 ही आली या मोटर सायकलची आराम बसला धडक बसली आणि मोटर सायकल स्वार गणेश हा रस्त्यावर कोसळला त्याच्या अंगावरून बस गेली तर त्याच्या पाठीमागे बसलेली रुची राजन वालावलकर रा गावराई तालुका कुडाळ वय वर्षे 24 ही रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. त्यामुळे ती वाचली तिला किरकोळ जखमा झाल्या. तर मोटरसायकलला वाचवण्याच्या नादात आराम बस रस्त्याच्या खाली उतरली यामुळे आराम बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले या सर्वांवर सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

हा अपघात सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडला अपघाताची खबर समजतात रानबांबुळी, सुकळवाड, वराड, कट्टा, गावराई,ओरोस सह आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली तर सिंधुदुर्ग नगरी पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी शेखर लव्हे यांच्यासह सिंधुदुर्ग नगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र जोपर्यंत आराम बसचा मालक येऊन नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत रस्त्यावरील मृतदेह आम्ही हलवणार नाही असा पवित्रा वराड ग्रामस्थांनी घेतला पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र हे सर्व ग्रामस्थ आपल्या म्हणण्यावर ठाम होते तसेच आक्रमकही झाले होते.घटनास्थळी वाढलेली गर्दी पाहता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागील होता. सिंधुदुर्गनगरीसह कणकवली, कुडाळ,मालवण आदी भागातून मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तर घटनास्थळी शिग्रकृती दल दाखल झाले होते. मालवण कसाल हा रस्ता नेहमीच वर्दळ असलेला रस्ता आहे. त्याचबरोबर काल शनिवारीच गणेशोत्सव संपल्याने पुन्हा मुंबई, पुण्याला जाणाऱ्या चाकरमान्यांची रहदारी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात होती. त्याचबरोबर पर्यटकही या मार्गावर असतात त्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये यासाठी पोलिसांनी  प्रयत्न केले. 

अखेर सायंकाळी सात वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात हालविण्यात आला. जोपर्यंत आराम बसचा मालक घटनास्थळी येत नाही आणि नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही असा पवित्रा वराड ग्रामस्थांनी घेतला यानंतर या ठिकाणी बरेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी वगैरे उपस्थित होते भाजपाचे मंडळी अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत,रानबांबुळी सरपंच परशुराम परब यांच्यासहसुकळवाड सरपंच पोलिस पाटील याचबरोबर कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. या विषयात मध्यस्थी करण्याचा बराच प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याने अखेर आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधण्यात आला आमदार निलेश राणे यांनी संबंधित आराम बसचा मालक याच्याशी संपर्क साधून चर्चा केली त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली आणि आपण मृतदेह ताब्यात घ्यावा अशी विनंती केली या गोष्टीलाही ग्रामस्थ तयार झाले नाहीत शेवटी रस्त्यावरील मृतदेह उचलून तो जिल्हा रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र प्रत्यक्ष मालक येऊन त्याने चर्चा करून नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही यावर वराड तालुका मालवण येथील ग्रामस्थ ठाम आहेत. 

 दीड तास मार्गावरील वाहतूक ठप्प 

मालवण कसाल या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते पर्यटक याचबरोबर गणेशोत्सव संपून माघारी जाणारे चाकरमानी यामुळे रविवारी सायंकाळी तर मोठ्या प्रमाणात वर्दळ होती मात्र रानबांबुळी येथे घडलेला अपघात आणि त्यामुळे येथे झालेली गर्दी या सर्व पार्श्वभूमीवर सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती मात्र ही  वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत होते. या ठिकाणी मालवण पोलीस ठाणेचे  पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह त्यांचा पोलीस फाटाही उपस्थित होता.