खोक्रल गावावर दुःखाचा डोंगर

विद्युत वाहिन्यांचा स्पर्श | तरुणाचा मृत्यू
Edited by: लवू परब
Published on: September 01, 2025 19:44 PM
views 588  views

दोडामार्ग : खोक्रल येथे गणेश विसर्जन स्थळी साफसफाई करण्यासाठी गेले असता तेथील अकरा केव्ही विद्युत वाहिन्यांचा स्पर्श होऊन सूर्याजी साबाजी कुबल ( वय २५ ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर, त्याच्या सोबत असलेल्या गावचे उपसरपंच भरत लक्ष्मण गवस (वय ३२ ) यांना सौम्य धक्का लागल्याने ते जखमी झाले. पुढील उपचारासाठी त्यांना गोवा आझिलो रुग्णालय येथे हलविण्यात आले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश चतुर्थीच्या धाम धूम आणि मंगळवारी सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन असल्याने गावातील विसर्जन तळीकडे साफसफाई करण्यासाठी सूर्याजी कुबल व गावचे उपसरपंच भरत गवस हे दोघे गेले होते. साफसफाई करत असताना तेथील झाडी झुडुपे मारत असताना विद्युत वाहिन्यांचा सूर्याजी कुबल याला नकळत स्पर्श झाल्याने त्याला जोराचा झटका बसत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या उपसरपंच भरत गवस यांना ही त्याचवेळी वीजेचा धक्का लागला परंतु त्यांच्या पायात चप्पल असल्याने ते बाजूला फेकले गेले व बालंबाल बचावले.

त्यांनी आरडाओरड केल्याने जवळील स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांना तत्काळ खाजगी वाहनाने साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तत्पूर्वी सूर्याजी याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच भरत यांच्यावर उपचार सुरू केले. व अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने आझीलो गोवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू झाल्याचे स्पष्ट केल्यानंतरही ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा सूर्याजी याची तपासणी करण्यास सांगितली. त्यावेळी डॉ. जगदीश पाटील यांनी इसीजी करून सूर्याजी हा मयत झाल्याचे स्पष्ट केले. हे ऐकताच नातेवाईक व  ग्रामस्थांनी एकच हंबरडा फोडला. रुग्णालयात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

गणेश चतुर्थीची सर्वत्र धाम धूम सुरु आहे. पाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यावर मांगळवारी 7 दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीत सर्व जण असताना तालुक्यातील खोक्रल  गावात विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन सूर्याजी कुबल या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याने खोक्रल गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.