
चिपळूण : लोटे - धामणदिवी परिसरातील सुप्रसिद्ध डॉक्टर हेमंत चितळे (वय ७७) यांचे मंगळवारी दि. २६ ऑगस्टला राहत्या घरी निधन झाले. घरी गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. मुलगी डॉ. श्रुती आणि मुलगा डॉ. ऋषिकेश यांनी तातडीने प्रयत्न केले, मात्र, त्यांना वाचवता आले नाही.
डॉ. चितळे यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९४८ रोजी चिपळूण येथे झाला. प्राथमिक शिक्षण खेंड येथे, तर माध्यमिक शिक्षण परांजपे मोतीवाले (श्रीराम) हायस्कूलमध्ये झाले. पुढे सांगली येथील वेलिंग्टन कॉलेज आणि पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएस पदवी संपादन केली. १९७१ मध्ये पाकिस्तान - बांगलादेश युद्धकाळात त्यांनी प्रत्यक्ष रणांगणाजवळ दोन ते तीन महिने देशसेवा बजावली होती.
१९७३ साली साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी सरकारी सेवेत प्रवेश केला. त्यानंतर गुहागर, कडवई, संगमेश्वर, चिपळूण आदी ठिकाणी सेवा करून शेवटी लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रातून ते निवृत्त झाले. सेवेत असताना त्यांनी रुग्णसेवेसोबतच क्रीडा व सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. साखरप्यासारख्या छोट्या गावात राज्यस्तरीय कॅरम व व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन त्यांनी केले होते.
रायगड जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या काळात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पूरग्रस्तांपर्यंत जीवनावश्यक साहित्य पोहोचविले होते. १९९२ साली त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांच्या वर्गमित्र व प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितू मांडके यांनी बायपास शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतरही ते सक्रिय राहून रुग्णसेवेत कायम गुंतलेले होते.
डॉ. चितळे यांच्या सेवाकाळात लोटे येथील एका रुग्णाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी मोठा जमाव जमविला होता. मात्र, त्यांनी संयमाने संवाद साधत ग्रामस्थांचा विश्वास जिंकला व परिस्थिती शांततेने हाताळली. रुग्णसेवेतील त्यांची निष्ठा आणि पारदर्शकता यामुळे ग्रामस्थांचा त्यांच्या वरचा विश्वास अखेरपर्यंत कायम राहिला.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. वाचनाची आवड, कोणत्याही विषयावर सहज संवाद साधण्याची क्षमता आणि आयुष्यभर रुग्णसेवेची धडपड यामुळे डॉ. हेमंत चितळे नेहमी स्मरणात राहतील. रुग्णांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी धाडणारे डॉ. चितळे यांचा अखेरचा प्रवासही रुग्णवाहिकेतूनच झाला, ही बाब अनेकांना भावूक करून गेली.