
कणकवली : कणकवली शहरातील कांबळेगल्ली येथील भालचंद्र नगर येथे एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रत्नप्रभा शंकर पंडित (८५, मूळ रा. हळवल) या आग लागल्याने भाजल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली.
याबाबत अधिक वृत्त असे की, भालचंद्रनगर येथील कामत बिल्डिंगमध्ये दुसºया मजवल्यावर चित्रा शिरोडकर यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये रत्नप्रभा पंडित या गेल्या २० वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. सोमवारी २८ रोजी सायंकाळी रत्नाप्रभा पंडित यांना जेवणाचा डबा देण्यासाठी संतोष सुखटणकर गेले होते. त्यांनी फ्लॅटचा दरवाजा ठोकावला. मात्र, त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर संतोष यांनी मधू पाटील, अवधुत सुतार यांना बोलून घेतले. तिघांनी बंद असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रत्नप्रभा या जळालेल्या अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या.
त्यानंतर त्यांनी रत्नप्रभा यांना रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत संतोष दिनकर सुखटणकर (५६, रा.जळकेवाडी, कणकवली) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे.