कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडून युवकाचा मृत्यू

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 22, 2025 18:43 PM
views 180  views

कणकवली : मुंबईहून मडगावला जात असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडून राहुल संतोष सावर्डेकर (२९, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) हा युवक मृत्यूमुखी पडला. ही घटना कणकवली आणिक्षनांदगाव रेल्वेस्थानकांदरम्यान जानवली येथे मंगळवारी सकाळी ९.३० वा. सुमारास घडली.

राहुल सावर्डेकर हा कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधून प्रवास करत होता. प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलाला दिलेल्या माहितीनुसार राहून हा दरवाजाजवळ तोंड धूत होता. त्यावेळी अचानक तोल गेल्याने तो रेल्वेच्या बाहेर पडला व एका दगडावर आपटला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच मृत्युमुखी पडला.

दरम्यान या घटनेची माहिती कोकणकन्या एक्सप्रेसच्या लोकोपायलेटने कणकवली रेल्वे स्टेशन येथे दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक निरीक्षक दुर्गेश यादव घटनास्थळी दाखल झाले. कणकवली पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. १०८ रुग्णवाहिकद्वारे दुर्गेश याचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.