जानवलीत तलावात बुडून प्रौढाचा मृत्यू

Edited by:
Published on: June 09, 2025 13:34 PM
views 1395  views

कणकवली : जानवली येथे तलावात प्रौढाचा बुडून किसन भिकाजी पवार (५१, रा. जानवली-बौद्धवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. जानवली पोलीस पाटील मोहन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार , रविवारी किसन पवार यांच्यासह अन्य चौघेजण पार्टीसाठी जानवली येथील तलाव क्षेत्रात गेले होते. किसन पवार हे धरण क्षेत्रातील तलावात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. रविवारी रात्री किसन  हे घरी परतले नाही. त्यांची शोधाशोध झाली असता त्यांच्यासोबत गेलेल्या चौघांनी संदिग्ध माहिती देत किसन तलावात बुडल्याचे सांगण्यास टाळाटाळ केली. मात्र; सोमवारी सकाळी नातेवाईकांनी याबाबत अधिकची माहिती घेत काल कुठे गेला होता? कुठे पार्टी केली? याची विचारणा केली. त्यानंतर जानवली तलाव क्षेत्रातील मुख्य गेटपासून शोधाशोध करत त्या चौघांना घेऊन ज्या ठिकाणी पाच जणांनी एकत्र जेवण केले, तिथपर्यंत ग्रामस्थ पोहोचले. तेव्हा किसन हे तेथे पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, पोलीस पाटील मोहन सावंत, दामू सावंत, संदीप सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. किसन पवार यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.