
दापोली : पुणे येथून पर्यटनासाठी आंजर्ले येथे आलेल्या एका महिला पर्यटकाचा समुद्रात पोहण्यासाठी गेले असताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथून 12 जणांचा एक ग्रुप आज पहाटे 4 वाजता आंजर्ले येथे पर्यटनासाठी जाण्यासाठी निघाला. ते 11 वाजता आंजर्ले येथे पोचले. तेथील एका रिसॉर्ट वर त्यांनी नाष्टा केला व ४ वाजण्याच्या सुमारास ते पोहण्यासाठी सममुद्राच्या पाण्यात गेले. पोहत असताना एक मोठी लाट आली व त्या लाटेत या ग्रुपमधील तन्वी निलेश पारखी वय 22, रा. विश्रांती वाडी पुणे दिसेनाशी झाली, त्यावेळी सोबत असलेल्या मित्रानी किनाऱ्यावरील ग्रामस्थांना माहिती दिल्यावर ग्रामस्थांनी पाण्यात बुडालेल्या तन्वीला पाण्याबाहेर काढून किनाऱ्यावर आणले मात्र तन्वी बेशुद्ध पडली होती. तिला उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले होते, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. दापोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे आंजर्ले परिसरात खळबळ उडाली आहे.