दुर्दैवी | वडाची फांदी पडून युवतीचा जागीच मृत्यू

Edited by: विनायक गांवस
Published on: July 23, 2024 09:21 AM
views 2205  views

सावंतवाडी : तळवडे येथील कॉलेजवयीन युवतीवर वडाचे झाड पडून तीचा जागीच मृत्यू झाला. सायली सतीश धुरी असं त्या युवतीच नाव असून ती बारावीत शिक्षण घेत होती‌. जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय तळवडेची ती विद्यार्थीनी होती. घरी जात असताना वडाच झाड अंगावरती पडून ती मृत्युमुखी पडली. 

तळवडे जनता विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या सायली सतीश धुरी, वय 17 हिच्यावर वडाचे झाड उन्मळून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता तळवडे मिरस्तेवाडी येथे घडली. कॉलेजमधून मैत्रिणींसह घरी परतत असताना ही घटना घडली. या घटनेत तिच्या मैत्रिणी बालंबाल बचावल्या. झाड पडल्याने विजेच्या ताराही जमिनीवर कोसळल्या. तिचे वडील सतीश धुरी यांचा होडावडा बाजारपेठेत पानपट्टीचा स्टॉल आहे. 

या घटनेची माहिती मिळताच तिचे काका तसेच प्रशालेतील शिक्षक व गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली.  घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत पुढील सोपस्कार केले. माजी नगराध्यक्ष संजू परब, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी देखील रूग्णालयात धाव घेत युवतीच्या कुटुंबियांना धीर दिला. याप्रसंगी तळवडेतील ग्रामस्थांनी सावंतवाडीत धाव घेतली. युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. पंचनाम्यानंतर पुढील सोपस्कार पूर्ण केले जाणार आहे.या दुर्दैवी घटनेमुळे तळवडेसह सावंतवाडी परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.