राणेंचा बंगला जाळपोळ प्रकरणाचा सूत्रधार समीर नलावडेच

संदेश पारकरांचा आरोप
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 23, 2025 13:03 PM
views 562  views

लोकांचे संसार उध्वस्त करणारी ही टोळी

कणकवली :

सत्यविजय भिसे हत्या प्रकरणानंतर कणकवलीत नारायण राणेंचा बंगला जाळला गेला, त्याचा प्रमुख सूत्रधार समीर नलावडे हेच होते. नलावडे यांचे नारायण राणे व कुटुंबावरील प्रेम बेगडी असून त्याची राणे कुटुंबीयांना देखील कल्पना आहे. कणकवली शहरातील एक इमारत कोणी जाळली होती? दोन इमारती जमीनमालक अथवा भाडे करूंना कल्पना न देता रातोरात कोणी उध्वस्त केल्या होत्या? असे सवालही कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष  संदेश पारकर यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना उद्देशून केले. या भ्रष्टाचारी टोळीला कणकवलीची जनता मतदानादिवशी जागा दाखवेल, असेही पारकर म्हणाले. 


आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पारकर बोलताना म्हणाले, सत्यविजय भिसे हत्या प्रकरणानंतर समीर नलावडे यांनी जे काही केले होते ते विसरून निलेश राणेंनी त्यांना मागील वेळी आपल्या स्वाभिमान पक्षातर्फे नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. अर्थात निलेश राणेंचे नलावडे यांच्यावर उपकार आहेत. मात्र नलावडे यांनी भिसे प्रकरणानंतर जो प्रकार केला होता तो नितेश राणे विसरलेत का? त्यामुळेच त्यांनी नलावडे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. वास्तविक मी नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये त्यावेळी प्रामाणिक राहिलो होतो. नारायण राणे हेच जिल्ह्यातील जेष्ठ नेते आहे,  हे कधीही नाकारता येणार नाही, असेही पारकर म्हणाले.


लोकांचे संसार उध्वस्त करणे हीच नलावडे व त्यांच्यासोबतच्यांची प्रवृत्ती आहे. कणकवली शहरातील टोणेमारे चाळीला आग कुणी लावली होती? शहरातील जुने रेवडेकर हॉस्पिटल व कोहिनूर लॉज रातोरात कोणी जमीनदोस्त केला होता? मालक व भाडेकरू यांनाही त्याची कल्पना नव्हती. असाच प्रकार एसटी बसस्थानकासमोरील एका इमारतीच्या बाबतीतही घडला होता. मागील सत्ताधारी हे जनतेला लुटणारी टोळी होती. ते निवडणुकीपूर्वी कसे होते व आज काय आहेत? पराभवाची चाहूल लागताच ते दुसऱ्यांवर आरोप करायला लागले आहेत, असेही पारकर म्हणाले.