रोह्यात 11 रोजी जागतिक अपंग दिनानिमीत्त कर्णबधिर अपंग शिबीर

सवलतीच्या दरात करण्यात येणार कानाच्या मशीनचे वाटप
Edited by: शशिकांत मोरे
Published on: December 09, 2022 16:45 PM
views 185  views

रोहा : रोह्यात जागतिक अपंग दिनानिमीत्त युवक प्रतिष्ठान आणि हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप् यांच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधिर अपंग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींना कमी ऐकायला येत आहे किंवा त्रास होत आहे अशा रुग्णांची याठिकाणी तपासणी केली जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रागृहात रविवार दि. ११ डिसे.रोजी सकाळी १०:३० पासून ३:०० वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरासाठी भाजपाचे नेते, खासदार किरीट सोमय्या यांच्यासमवेत मुलुंड ( निलमनगर) चे नगरसेवक नील किरीट सोमय्या,आखिल भारतीय पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्ठीवकर, सिटिझन फोरमचे निमंत्रक प्रदीप (आप्पा) देशमुख, शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख,ॲड.मनोजकुमार शिंदे, रोहा सिटिझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते तानाजी(आप्पा)देशमुख, हेल्पर्स ऑफ दि इण्डिकैप्ड संस्थेचे अध्यक्ष प्रमोद (पी.डी) देशपांडे, यांसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पिंगळसई गावच्या सामाजिक कार्यकर्त्या,हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ट संस्थेच्या रायगड प्रकल्प प्रमुख रोशन अमोल देशमुख यांसह सहकारी वर्गाने हे शिबिर आयोजित केले असून देशमुख यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल म्हणून नुकतेच कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले आहे.


सातत्याने गावोगावी,विविध ठिकाणी शिबिरासाठी त्यांना त्यांच्या सहकारी वर्गाची चांगली साथ मिळत आहे.आयोजित कार्यक्रमात १० वी व १२ वी उत्तीर्ण अपंग मुलं,मुलींचा त्यांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.तर शिबिरात कर्णबधिर रुग्णांची तपासणी झाल्यानंतर त्या रुग्णाला गरज भासल्यास सवलतीच्या दरात कानाच्या मशिंनचेही वाटप करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ट संस्थेच्या रायगड प्रकल्प प्रमुख रोशन अमोल देशमुख यांनी केले आहे.