
सावंतवाडी : दाणोली बांदा रस्त्यावर असलेल्या दाभिल सरमळे गावातील सात बाय या ओढ्यात मृत वाघीण आढळून आली. कोकणीरान माणूस प्रसाद गावडे व येथील स्थानिक सचिन घाडी हे दोघेही या डोंगरावरती फिरण्यासाठी म्हणून गेले होते त्यावेळी ते या ओढ्यामध्ये उतरले तेव्हा ही बाब त्यांच्या निदर्शनास आली.
या ओढ्यामध्ये 20 फूट खोल तळीत एक मृत वाघ असल्याचे लक्षात येतात त्यांनी तात्काळ वनविभागाला याबाबत खबर दिली. वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहउपवनसंरक्षक वैभव बोराटे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जात या प्रकाराची खातर जमा केली. वनमजूर तसेच कृती दलाच्या सदस्यांकरवी या वाघीणीला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी आलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विद्यानंद देसाई, डॉ विठ्ठल कराळे व डॉ मृणाल वरथी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मानव वन्यजीव रक्षक काका भिसे व पंच यांच्या समोर या मृत वाघाचे शवविच्छेदन केले. एखाद्या भक्षाच्या मागे धावत असताना व बाहेर येता आलं नसल्याने तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.