'त्या' युवकाच्या मृतदेहाची ओळख न पटल्याने तपासात अडथळे

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली घटनास्थळी भेट
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 23, 2023 22:19 PM
views 388  views

कणकवली :  कणकवली गणपतीचा साना येथे मिळालेल्या 25 वर्षीय युवकाच्या मृतदेहाची ओळख पटली नसल्याने  तपास कामात मोठा अडथळा येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी  मंगळवारी सकाळच्या सत्रात घटनास्थळी  भेट दिली व घटनेची माहिती जाणून घेतली. 

काही पोलिसांनी पाण्यात उतरून काही पुरावा मिळतो का? याचा शोध घेत तपास केला. त्यामुळे खुणाच्या अनुषंगाने पोलिसांचे तपासकाम सुरू असल्याचे दिसत आहे. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ हे या गुन्ह्याचा तपास  करत आहेत.


 रविवारी दुपारी दीडच्या सुमारास  23 ते 25 वर्षीय युवकाचा मृतदेह कणकवली गणपती सानानजीक नदीपात्रात सापडला होता.या तरुणाच्या उजव्या दंडावर नागाचे चीत्र गोंदले आहे. व त्याच्या गळ्याजवळ एक कपडा बांधलेला आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. नेमका त्याचा मृत्यू कसा झाला ?त्याला कोणी मारून टाकले ? की आत्महत्या केली? अशा शंका कुशंका निर्माण झाल्या. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तत्परतेने पोचून पंचनामा केला  होता व मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आला. व सिंधुदुर्ग येथील गुन्हे शाखा विभागाच्या वतीने जलद गतीने तपास कार्य सुरुवात केली होती.


मात्र तीन दिवस होऊन गेले तरी त्या मृतदेहाची अजून देखील ओळख पटली नसून पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ हे या गुन्ह्याचा  तपास करत आहेत. तसेच तो युवक ज्यांना ज्यांना दिसला त्यांच्याजवळ पोलिसांनी जाऊन माहिती घेत आहेत.  तो युवक दोन दिवस कणकवलीत फिरत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना मिळाले आहे. पण अजून देखील तो कोण?कुठून आला ?त्याचा नेमका मृत्यू कसा झाला? यासंदर्भात पोलीस कसून शोध घेत आहेत.