डीबीजेत 'आर्थिक विषयावर मार्गदर्शन

Edited by: मनोज पवार
Published on: August 25, 2025 16:37 PM
views 60  views

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स फोरम या विभागांतर्गत 'आर्थिक अंदाजपत्रक' या विषयावर यशवंत उर्फ राजा बर्वे (शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया) यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एम. एल. निपाने यांनी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते  यशवंत उर्फ राजा बर्वे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  मार्गदर्शनपर कार्यक्रमात 'आर्थिक अंदाजपत्रक ' हा अर्थव्यवस्थेचा मुख्य दस्तावेज आहे, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेची दशा व दिशा निश्चित करण्यासाठी, अंदाजपत्रक हा एक महत्त्वाचा आराखडा आहे. यामध्ये व्यक्ती, समूह, संस्था, व्यवसायिक तसेच देशाला आर्थिक नियोजन करत असताना याचा अतिशय उपयोग होतो. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक कर्जाची मदत बँकांकडून कशी केली जाते. त्याचबरोबर मदतीसाठी असलेली पात्रता कसे निश्चित केली जाते. याविषयीची माहिती  यशवंत बर्वे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.  एम. एल. निपाने यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय, एस. आर. इंगळे यांनी करून दिला.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. बापट, कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्या प्रा. सौ.स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका प्रा. सौ. सुजाता खोत, सह समन्वयक अविनाश पालशेतकर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. सोनाली खर्चे यांनी केले तर आभार प्रा. सौ. दिशा दाभोळकर यांनी मानले.