
वेंगुर्ले : दशावतार कला ही आठशे वर्षांपूर्वीची जुनी लोककला आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ही कला सातासमुद्रापार गेली आहे. दशावतार सारख्या कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. दत्तमाऊली दशावतार मंडळ हे दशावताराच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत आहेत हे गौरवास्पद आहे. दशावतारी कलाकारांना सन्मान मिळवून देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू. असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी वेंगुर्ला मठ येथे आयोजित कार्यक्रमात केले.
दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुद्देशीय मंडळ सिंधुदुर्ग यांच्या "प्रवास दत्तमाऊलीचा, सोहळा त्रै वर्ष पूर्तीचा" या अंतर्गत रविवारी २० जुलै रोजी आयोजित पुरस्कार वितरण, बक्षीस वितरण व विविध सन्मान कार्यक्रमात आमदार वैभव नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मठ सरपंच रुपाली नाईक, ग्रा. प. सदस्य नित्यानंद शेणई, जेष्ठ दशावतार कलाकार महेश गवंडे, उद्योजक दीपक ठाकूर, ऍड. सोनू गवस, सरपंच संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई, ऍड. पी. डी. देसाई, लेखापरीक्षक राकेश धरणे, मंडळाचे हितचिंतक राजन बोवलेकर, दोडामार्ग दशावतार कलाकार संघटना अध्यक्ष सुभाष लोंढे, खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचे चालक मालक बाबा मेस्त्री, झी २४ तास चे राजा दळवी, दयानंद शेणई, कुडाळ सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे, कुडाळ माजी पं स सभापती संजय वेंगुर्लेकर, आंदूर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात मंडळाकडून दिला जाणारा विशेष "दत्तमाऊली दशावतार कला तपस्वी पुरस्कार २०२३" जेष्ठ दशावतार कलाकार यशवंत रघुनाथ तेंडोलकर यांना देऊन गौरविण्यात आले. साक्षात वैकुंठीच्या नारायणाने या पुरस्काराचे नामकरण करून हे नामकरण आपले वाहन गरुडा करवी व्यासपीठावर पाठवले असा देखावा करण्यात आला होता. यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तेंडोलकर यांचा त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, भव्य दशावतार सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तर निवृत्त शिक्षिका माधवी यशवंत मठकर यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच यावेळी पाट येथील स.का. पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी पुराच्या पाण्यात वाहून जात असताना तिला वाचवणाऱ्या आंदूर्ले येथील जयेश कोनकर, निवती येथील जितेश भगत यांचाही शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव दत्तप्रसाद शेणई यांनी संस्थेच्या सुरुवातीपासूनच्या वाटचालीबाबत माहिती देताना या प्रवासात सहकार्य केलेल्या सर्व दात्यांचे आभार मानले. व नाट्यरसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मंडळाच्या पहिल्या वर्षी १२०, दुसऱ्या वर्षी २३५ व तिसऱ्या वर्षी तब्बल २७० नाट्यप्रयोग सादर केल्याचेही सांगितले. तर अध्यक्ष बाबा मयेकर यांनी संस्थेच्या कार्याबाबत माहिती देताना आपली संस्था ही नाट्यप्रयोगातून समाज प्रबोधनाचे काम करत असून या माध्यमातून अजून गरुड भरारी घ्यायची असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नेवगी यांनी केले.
दत्तमाऊली दशावतार मंडळाने केलेल्या या सन्मानाने आपण भारावून गेलो. दशावतार कलेची सेवा अजून माझ्याहातून करून घेण्यासाठी कोरोना काळात मरणाच्या दारातून त्या परमेश्वराने पुन्हा मला पाठवले. आयुष्यात खुप आघात सोसले मात्र या कलेने तेवढेच भरभरून मला दिले. जोपर्यंत स्मरणशक्ती आहे तोपर्यंत नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करत राहणार. असल्याचे यावेळी यशवंत तेंडोलकर यांनी सन्मानाला उत्तर देताना सांगितले.