'दशवतार' पुस्तक रुपातून भेटीला

सावंतवाडीत शानदार प्रकाशन ; 'यक्षगान' नाट्यप्रयोगाच आकर्षण
Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2024 06:03 AM
views 258  views

सावंतवाडी : पद्मगंधा प्रकाशन पुणे यांच्यावतीने 'दशावतार' कला आणि अभ्यास या पुस्तकाचं प्रकाशन ऐतिहासिक राजवाडा येथे करण्यात आले. राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकाच लेखन प्रा. विजयकुमार फातर्फेकर यांनी केले आहे. यानिमित्ताने कर्नाटक उडपी येथील 'यक्षगान' नाट्य प्रयोगाच मराठीतून सादरीकरण करण्यात आले. हा नाट्यप्रयोग खास आकर्षण ठरला. मोठ्या संख्येने कलारसिक मंडळी यावेळी उपस्थित होते. 

कोकणच्या 'दशावतार' कलेवर आधारित हे पुस्तक आहे. याच प्रकाशन शनिवारी सायंकाळी करण्यात आले.याप्रसंगी राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, नाटककार, लेखक प्रा. विजयकुमार फातर्पेकर, यक्षगान केंद्राचे संस्थापक संजीव सुवर्ण, अभिषेक जाखडे, डी.टी. देसाई, श्री.सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्राचार्य डी. एल.भारमल, सीमा मराठे, प्रा. पद्मा फातर्पेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती‌. दशावतार म्हणजे ग्रामीण जीवनातील लोककलेला फुटलेले अंकुर होत. गेली ५३ वर्ष दशावतार कलेचा अभ्यास करत असताना कर्नाटक उडपी येथील यक्षगान अभ्यासले आहे. माझे पहिले पुस्तक यक्षगान प्रकाशित झाले असून आता दशावतार होत आहे. दशावतारी कलेवर आकर्षित होऊन मी अभ्यास करून या पुस्तकाचे लेखन केले आहे. यक्षगान अभ्यास करताना माहिती गोळा केली ती दशावतार कलेसाठी देखील उपयोगी ठरली. दशावतार आणि यक्षगान या लोककला स्वतंत्र असल्या तरी त्या लोकांना भावतात अस मत  प्रा. विजयकुमार फातर्पेकर यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, यानंतर कर्नाटकी कलावंतांकडून यक्षगानचा प्रयोग मराठीतून सादर करण्यात आला. कर्नाटकातील उडपी येथील यक्ष संजीव यक्षगान केंद्राचे प्रमुख आचार्य व संस्थापक संचालक गुरु संजीव सुवर्णा आणि त्यांचे शिष्यगण यांनी हा प्रयोग सादर केला. याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पावसाच्या व्यत्ययामुळे खुल्या पटांगणात होणारा हा प्रयोग बंदीस्त सभागृहात पार पडला.