
खेड : दापोली व गुहागर मतदार संघात रविवारी दि.३ रोजी राजकीय भूकंप झाला असून खेड तालुक्यातील भरणे येथील हॉटेल बीसु सभागृहात रविवारी (दि. ३ ऑगस्ट) झालेल्या शिवसेना पक्ष प्रवेश कार्यक्रमात काँग्रेस, उबाठा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने खेडच्या खाडी भागात शिवसेनेला मोठा बळकटीचा आधार मिळाला आहे.
कार्यक्रमात मुस्लिम बहुल मोहल्ल्यांमधील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अस्लम हमदुले, अहमद मुल्लाजी यांच्यासह भरणे विभाग, शिर्शी, सवनस सडेवाडी, अलसुरे, भरणे मुस्लिम वेल्फेअर सोसायटी, संगलट, पन्हाळजे, उधळे मोहल्ला, होडखाड आदी भागातील शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता. याशिवाय माजी जिप सदस्य लक्ष्मण पाष्टे यांच्या नेतृत्वाखाली दापोली तालुक्यातील उन्हवरे (पानकरवाडी) येथील कार्यकर्ते, तसेच कर्जी मोहल्ला व आमशेत मोहल्ल्यातील कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाले. या वेळी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सिकंदर जस्नाईक यांनी नविन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करत त्यांना शिवसेना नेते रामदास कदम यांच्या हस्ते निवडपत्र प्रदान करण्यात आले.
“शिवसेना जातीयवादी नाही. खेडच्या मुस्लिम समाजाच्या विकासात रामदासभाई कदम यांचे मोठे योगदान आहे,” असे मत सिकंदर जस्नाईक यांनी व्यक्त केले. त्यांनी मोहल्ल्यांमधील नळपाणी योजना, रस्ते व शाळांची कामे शिवसेनेच्या माध्यमातून झाल्याचे नमूद केले. माजी आमदार संजय कदम यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. खालिद रखांगे, अस्लम हमदुले, अरविंद चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. या भव्य कार्यक्रमाला शिवसेना नेते रामदास कदम, माजी आमदार संजय कदम, गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अरुण कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मन्सूर नाडकर यांनी केले. ना. योगेश कदम यांनी, "शिवसेनेच्या पाठीशी मुस्लिम समाज नेहमीच ठाम राहिला असून, या पक्षप्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट झाला आहे. कोट्यवधींची विकासकामे मंजूर करण्यात आली असून खेड तालुक्यातील भागांनाही त्याचा लाभ होणार आहे," असे सांगितले.
रामदास कदम यांनी आपल्या भाषणात "शिवसेना पक्षात कधीही जातीपातीचा भेदभाव केला जात नाही," असे स्पष्ट करत, "१९९५ नंतर खेडमध्ये एकही दंगल झालेली नाही. जनतेसाठीच काम केले म्हणूनच आजही जनता माझ्या पाठीशी उभी आहे," असे ठामपणे नमूद केले. “माझ्या मतदारसंघाच्या विभाजनामुळे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चुकीमुळे मी पराभूत झालो. मात्र आता विकासासाठी पुन्हा काम सुरू केले असून खाडी भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी धरण मंजूर झाले आहे,” असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.