
दापोली : कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीला आलेल्या पुरामुळे कोंडीच्या पुलावरून एक तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. राजेंद्र कोळंबे (वय ४५) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र कोळंबे सकाळी ड्युटीवरून घरी परतत असताना वणंद येथील नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते कोंडीच्या पुलावरून वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या नदीपात्रात राजेंद्र कोळंबे यांचा कसून शोध सुरू आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असले तरी, शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. नागरिकांनी नदी-नाल्यांपासून दूर राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.