दापोली केळशीत आगळावेगळा पलिता नाच

Edited by: मनोज पवार
Published on: September 12, 2024 11:17 AM
views 335  views

चिपळूूण : दापोली तालुक्यातील केळशी गावात, गणेशोत्सवात गौराईचे आगमन झाल्यावर पेटते पलिते (मशाली) घेऊन नृत्य करायची पिढ्यांपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. पारंपरिक पद्धतीचा पलित्याचा हा नाच काल गौरी पूजनच्या रात्री रंगला. माहेरवाशीण गौराईला मानवंदना देण्यासाठी पेटलेला पलिता हाती घेऊन ढोल-सनईच्या तालावर श्रीकालभैरवाच्या साक्षीने रंगलेल्या सामूहिक पलित्यांचा या नाचाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या नृत्यात सर्वात पुढील व्यक्ती मशाल घेऊन असते. बाकीच्यांच्या हातात पलिते असतात. गणेशोत्सवात हा नाच कोकणात केळशी गावातच पाहायला मिळतो. हा नाच कोकणातील एक अनोखी परंपरा आहे. गौराईचे आगमन झाल्यावर केळशी गावातील सर्व वाडीतील ग्रामस्थ पांढरा सदरा, धोतर-लेंगा आणि डोक्यावर टोपी परिधान करून हातात धगधगत्या मशाली आणि पलेते घेऊन सनयी ढोलकीच्या तालावर लयबद्ध नाच करतात.  *आलेली गवर फूलून जाय, माळ्यावर बसून पोळ्या खाय* या गाण्यावर गावातील श्रीकालभैरव मंदिराजवळ एकत्र येऊन पलित्याचा नाच सादर करतात.