
सावंतवाडी : मुंबई-बेळगाव राज्य मार्गावरील कोलगाव निरुखेवाडी येथील सिनेमा थिएटर परिसरात मुख्य रस्त्यावर मोरी खचल्याने धोका निर्माण झाला आहे. या खचलेल्या मोरीजवळ केवळ बॅरेल ठेवून तात्पुरती उपाययोजना केली आहे, ज्यामुळे अपघात होण्याची भीती वाढली आहे.
स्थानिकांनी या गंभीर धोक्याकडे लक्ष वेधून तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची आणि भविष्यात कोणतीही हानी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागास केली आहे. हा रस्ता मुंबई आणि बेळगावला जोडणारा मुख्य राज्य मार्ग असल्याने या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड आणि हलकी वाहने ये-जा करतात. येथील धोका बघता बॅरेल ठेवून नागरिकांना सावध केले आहे. मात्र, रात्रीच्या वेळी रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसल्याने, तसेच बॅरेल स्पष्टपणे न दिसल्यास, वाहनांचे अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे










