...तर एकही वीज बिलं भरणार नाहीत ; दांडेली ग्रामस्थांचा महावितरणला इशारा

Edited by: जुईली पांगम
Published on: July 27, 2023 13:32 PM
views 185  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील दांडेली गावातील ग्रामस्थांनी जीर्ण झालेली विद्युत लाईन आणि कायमस्वरूपी वायरमन मिळावा यासाठी विद्युत महावितरणाला धडक दिली. बऱ्याच दिवसांपासून ग्रामस्थांची ही मागणी आहे. यासंदर्भातलं निवेदन सरपंच निलेश आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली उपअभियंता यांना देण्यात आलं. 7 दिवसांच्या आत या मागण्या पूर्ण न झाल्यास वीज बिल न भरण्याचा आणि आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. 


विद्युत लाईन आणि पोल जीर्ण झाल्यामुळे वारंवार तुटून विद्युत पुरवठा खंडित होतोय. बहुतेक वेळा ही परिस्थिती कायम असल्याने ग्रामस्थांना अंधारात रहावं लागतंय. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत असून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होतेय.  तसेच व्यापारी सर्वसामान्यांना नुकसानीला सामोरं जावं लागतंय. 

तसेच कायमस्वरूपी वायरमनची नेमणूक करावी. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने गावासाठी मळेवाड इथून स्पेशल विद्युत लाईन सुरु करून द्यावी आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी. या समस्यांकडे निवेदनाद्वारे महावितरणच्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यात आलं. या मागण्या 7 दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास वीज बिल न भरण्याचा आणि आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. 

सरपंच निलेश आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली उपअभियंता यांना हे निवेदन देण्यात आलं. यावेळी उपसरपंच सत्यनारायण माणगावकर,ग्रा. पं. सदस्य कृष्णा पालयेकर  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दीपक नाईक, तंटामुक्तीअध्यक्ष हेमंत कामत, माजी सरपंच संजय पांगम, माजी पोलीस पाटील दादा आरोलकर, संदीप माणगावकर, उदय पुनाळेकर, गुरुनाथ शिरोडकर, दुर्गेश मोरजकर, संतोष पिंगुळकर, सतीश बिरोडकर, महेश पांगम, अजित ठाकूर, अजित गोडकर, राजन मोरजकर, दादा गावडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.