न्हावेलीत गव्यांकडून शेतीचं नुकसान

Edited by: विनायक गांवस
Published on: January 31, 2025 19:59 PM
views 13  views

सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भात, नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांचे गव्यांनी मोठं नुकसान केलं आहे.

न्हावेली येथील शेतकरी प्रकाश धाऊसकर व रमेश धाऊसकर यांच्या मिरची, नाचणी, भुईमूग या शेतीत मोठ्या प्रमाणावर गवे रेडे घुसून शेतीची नासधूस केली आहे. याबाबत न्हावेलीचे उपसरपंच यांनी संबंधित शेतकऱ्यांची बांधावर जाऊन भेट घेत नुकसानाची पाहणी करून वन अधिकाऱ्यांना फोन करून झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला.

दरम्यान, या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच गव्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय हा भातशेती आहे. यापलीकडे जाऊन शेतकरी काजू, आंबा बागाची शेती देखील शेतकरी करत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून जंगल परिसराबरोबरच शेती, तसेच भर वस्तीतही गव्या रेड्यांकडून शेतीची नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शासन दरबारी ओरड मारुनही काहीच हाती लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गव्यांची संख्या खूप वाढली असून सह्याद्री पट्ट्यातील आंबोली, दोडामार्ग तालुका, माणगाव खोरे, सावंतवाडी तालुक्यातील बऱ्याच गावांत गव्यांचे वास्तव्य दिसत आहे. वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.