
कणकवली : यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत भातशेतीचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार कृषी विभागाकडून भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून आपण स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचमी केले आहेत व त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे यांनी दिली.
भातशेती कापणीला आलेल्या स्थितीत असताना यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. सातत्याने मोठ्या प्रमाणात झालेल्या या पावसात काही ठिकाणी तयार झालेल्या भाताच्या लोंबीला अंकुर आलेले होते.
तर, काही भागात भातशेती पडून त्यावर पाणी साचल्याने नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी अवकाळी पावसामुळे भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.