
चिपळूण : ग्रामीण भागातील भात शेती कापण्यासाठी परिपूर्ण झाली आहे. मात्र आधी मधी पडणाऱ्या जोरदार पावसामुळे परिपूर्ण भात शेतीचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर वन्य प्राण्यांमुळे सुद्धा शेतीची नासधुस केली जात आहे. अशा परिस्थितीत हाता तोंडाशी आलेला घास हिरावून जातो की काय? ह्या काळजीने बळीराजा सुद्धा हवालदिल झाला आहे.
गणपती मध्ये पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे हळवी भात शेती उत्तम प्रकारे तयार झाली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा काही दिवस कडक ऊन पडल्यामुळे हळवी शेती लवकर तयार झाली. मात्र आता अधून मधून जोरदार पाऊस पडत असल्याने कापणी साठी तयार झालेल्या भात शेतीचे नुकसान होत आहे. कापलेले भात सुकण्यासाठी शेतात ठेवू शकत नाही. कारण अवेळी पडलेल्या पावसाचे पाणी सुद्धा शेतात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कामाचा सुद्धा खोळंबा होत आहे. त्यामुळे भात कापणीच्या तयारीत असलेला शेतकरी सध्या पावसाच्या येण्या-जाण्यावरतीच अवलंबून आहे. त्यातच वन्य प्राणी सुद्धा शेतीमध्ये घुसून शेतीचे नुकसान करत आहेत . शेताचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे साठी रात्रीच्या समयास शेतीची राखण करत आहेत. तरीसुद्धा वन्यप्राणी शेतीची नासधुस मोठ्या प्रमाणात करत आहेत. अवेळी पडणारा पाऊस आणि वन्य प्राण्यांचा शिरकाव यामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे.
वर्षभर मेहनत घेऊन हाता तोंडाशी आलेला घास अवेळी पडलेल्या पावसामुळे वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये भात कापणीचा जोरदार हंगाम सुरू होतो. यावेळी शेतकरी दिवसभर शेतामध्येच उन्हातानात भात कापून झाल्यानंतर त्याच्या पेंड्या बांधून घरी वाहतूक करत असतो. घरी गेल्यानंतर पुन्हा ते भात झोडणे आणि पेंढा डाळून ठेवणे, यासाठी त्याची लगबग सुरू असते. कारण पाऊस कधी पडेल हे सयाचा अंदाज नसतो. शेतातील मोत्याचा दाणा घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. काही दिवस रोज संध्याकाळच्या वेळेस अचानक पाऊस पडत असल्याने शेतकऱ्याच्या कामाचा सुद्धा खोळंबा होत आहे. हळवी भात शेती कापणीसाठी परिपक्व झाली आहे. मात्र भात शेती कापली आणि पाऊस पडल्यास त्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकरी सुद्धा काय करावे या विवंचनेत अडकला आहे.