रेड अलर्टमुळे दळवी फाउंडेशनची स्वच्छता मोहीम स्थगित..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 01, 2023 14:27 PM
views 155  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात हवामान खात्याने कमी दाबाच्या पट्टयामुळे ४८ तासात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे एस आर दळवी फाउंडेशनने सोमवारी २ ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेली स्वच्छता मोहीम स्थगित केली आहे.

विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र दळवी आणि सिता दळवी या दांम्पत्याने स्थापन केलेल्या बहुउद्देशीय अशा राज्यस्तरीय एस आर दळवी फाउंडेशनने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या ६७ व्या जयंतीचे औचित्य साधुन पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने प्रत्यक्ष कृतीसह जनजागृतीसाठी वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.       

मात्र, हवामान खात्याने जिल्हयात रेड अलर्ट इशारा दिल्यामुळे ही स्वच्छता मोहिम तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग व मुंबई कोअर कमिटीने घेतला आहे. या मोहिमेची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन एस आर दळवी फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन कृष्णा मदने, उपाध्यक्ष चेतन बोडेकर, सरचिटणीस विजय गावडे यांनी केले आहे.