मधमाशांचा हल्ल्यात दुधव्यावसायिक गंभीर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 03, 2024 20:10 PM
views 142  views

देवगड : दुधविक्रीसाठी मिठमुंबरी येथून देवगडला जात असताना मिठमुंबरी रस्त्यावर मधमाशांनी अचानक हल्ल्याने दुध व्यावसायिक प्रकाश भिवा गावकर(६०) रा.मिठमुंबरी खालचीवाडी हे जखमी झाले. त्यांच्यावर देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना २ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली.

मिठमुंबरी येथील प्रकाश भिवा गावकर हे दुधव्यावसायिक असून ते नेहमी देवगडमध्ये ग्राहकांना दुध पोहच करण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ९ वाजता पायी ते मिठमुंबरी येथून दुध घेवून देवगडकडे जात असताना रस्त्यातच मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याने ते घाबरले व रस्त्याचा बाजुला असलेल्या मोरीजवळ असलेल्या खाजणाच्या पाण्यात उडी मारली. त्यावेळी मधमाशांनी त्यांचा पिच्छा सोडला. मात्र अंगावर हल्ला केल्यामुळे ते बेशुध्द पडले ही बातमी मिठमुबरी येथील ग्रामस्थांना समजताच तात्काळ धाव घेवून त्यांना देवगड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.