
सावंतवाडी : न्हावेली येथील मुख्यमंत्री ग्राम सडक रस्त्याशेजारी वाढलेल्या झाडी-झुडपांमुळे नागरिकांना वाहतूक व सुरक्षिततेच्या अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर न्हावेली उपसरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय पार्सेकर यांनी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून झाडी-झुडपे तोडण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभागामार्फत रस्त्याशेजारील झाडी व झुडपांची तोडणी करण्यात आली. या कामामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना सुरक्षिततेची हमी मिळाली आहे.
यावेळी काम चालू असताना उपसरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय पार्सेकर सोबत दिपक पार्सेकर, दिपक परब यांनी कामाची पाहणी केली. उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी या कामासाठी तत्परता दाखविल्याबद्दल कार्यकारी अभियंता चव्हाण यांचे आभार मानले आहेत.