शहरातील धोकादायक झाडे तोडा : मंगेश तळवणेकर

Edited by: विनायक गावस
Published on: September 27, 2023 19:05 PM
views 115  views

सावंतावडी : तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे शहरातील धोकादायक झाडे तोडणेबाबतची मागणी माजी आरोग्य व शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी केली आहे.मंगळवारी रात्री सावंतवाडी शहरात झाड पडून लाईट पोल तुटून वीजेचा शॉक बसून दोन तरुण मुलांचा दुर्दैवी अंत झाला. यात मुलांची काहीही चुक नसताना जे बळी गेले त्यामुळे शासनाने त्याच्या कुटुंबियांना भरीव मदत द्यावी. तसेच शहरात किंवा रस्त्याच्या बाजूला जी झाडे धोकादायक अवस्थेत आहेत त्या झाडांच्या मालकांना तहसिलदार कार्यालयाकडून तसेच नगरपरिषदेकडून सदरची झाडे त्वरीत तोडून घ्यावीत. सावंतवाडी शहरात शेकडो झाडे अशी आहेत की, त्यांचे मालक मुंबई किंवा अन्य ठिकाणी राहण्यास असून वर्षानुवर्षे ते गावी येत नाहीत. त्यामुळे तेथे राहणाऱ्या भाडोत्र्यांचाही नाईलाज असतो. तसेच मंगळवार दिवशी जो आठवा बाजरत भरतो त्या ठिकाणी, रेस्ट हाऊस जवळ देखील रस्त्यावर आलेली धोकदायक झाडे आहेत.

काही वर्षांपूर्वी मी पोलीस लाईन व शाळा, कॉटेज हॉस्पीटल जवळील झाडे तोडून दिली होती. त्यावेळी सा.बां.विभागाने सांगितले होते की, आमचेकडे झाडे तोडणेसाठी कोणतीही तरतुद नाही. तरी यापुढे तशी तरतुद प्राधान्याने विशेष बाब म्हणून करण्यात यावी.

जर संबंधित झाड मालक कळवूनही झाडे तोडण्यास ऐकत नसतील तर तहसिलदार, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, वीज अभियंता, कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग यांची तातडीची बैठक घेऊन, संबंधित झाड मालकांवर साम-दाम-दंड यांचा वापर करुन शहरातील रस्त्यावर आलेली सर्व धोकादायक झाडेे येत्या सात दिवसात तोडून घ्यावीत, अन्यथा शासनाला व स्थानिक प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्हाला तहसिलदार कार्यालयावर भव्य मोर्चा आणावा लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा तळवणेकर यांनी दिली आहे