अखेर सीटीस्कॅन सेवा पुर्ववत !

देयकाची रक्कम शासनाने न दिल्याने झाले हाल ; रूग्णांना आर्थिक भुर्दंड !
Edited by:
Published on: April 14, 2025 19:51 PM
views 127  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे कृष्णा डायग्नोस्टीक सेंटर कोल्हापूर यांच्या माध्यमातून मोफत सीटीस्कॅन रिपोर्ट करून दिले जात असल्याने सर्वसामान्य रूग्णांना दिलासा मिळाला होता. तसेच केवळ रिपोर्टसाठी करावी लागणारी कुडाळवारी व आर्थिक भुर्दंड यातून सुटका होत होती. मात्र, शासनाने देयकाची रक्कम न दिल्यानं ही सुविधा काहीकाळ बंद करण्यात आली होती. यामुळे रूग्णांचे प्रचंड हाल होत होते‌. अखेर शासनाने तोडगा काढल्यावर ही सेवा पुर्ववत करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातील सरकारी रुग्णालयात ही सेवा काहीकाळ बंद होती.  

माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात सीटीस्कॅन मशिन सावंतवाडी रुग्णालयाला दिली होती‌. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून ही सेवा सावंतवाडीकरांना उपलब्ध झाली. गेले वर्षभर चांगली सेवा मिळत असल्याने रिपोर्ट साठीची कुडाळवारी व खिशाला हजारांचा पडणारा भुर्दंड यातून सुटका झाली होती. मात्र, शासनाकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील या कंपनीची सहा महिन्यांची देयक न दिल्यानं काही दिवसांसाठी ही सुविधा बंद करण्यात आली होती. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती होती. अखेर शासनाने यात तोडगा काढला असून ती सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सीटीस्कॅन रिपोर्ट मोफत मिळत असल्यानं गोरगरीब रूग्णांना फायदा होत आहे. त्यामुळे शासनाने हे देयक थकित ठेवु नये. ही सेवा बंद झाल्यास रूग्णांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे या कंपनीला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जावा अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.