कुसूर येथे एकाला मारहाण

तिघांविरोधात गुन्हा दाखल
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 16, 2023 19:17 PM
views 508  views

वैभववाडी : सामायिक घराच्या वाटपावरून कुसुर गवळवाडी येथील दिलीप शिवराम दळवी यांना भावांसहीत अन्य दोघांनी मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्री.दळवी हे नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे कुसूर खालची गवळवाडी येथे सामायिक घर आहे. 

या घरात सावत्र भाऊ रामचंद्र शिवराम दळवी हे आपल्या कुटुंबासह राहतात. दिलीप हे मे महिन्यात गावी आले होते. त्यावेळी त्यांनी सावत्र भाऊ रामचंद्र यांच्याकडे घराच्या हिस्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी नकार मिळाल्याने त्यांनी गावच्या तंटामुक्ती समितीकडे आपल्या सामायिक घराच्या वादासंदर्भात अर्ज दिला होता.
 तटांमुक्ती समितीकडे तडजोड झाली नव्हती. दरम्यान श्री.दळवी हे दोन दिवसांपूर्वी  पुन्हा गावी आले. शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास सावत्र भाऊ रामचंद्र व त्यांचा मुलगा यशवंत कामावरून घरी आल्यानंतर दिलीप यांनी सामायिक घराचा विषय काढला. यावेळी रामचंद्र यांनी तुझे घर येथे नाही. या घरासाठी मी १० लाख रुपये खर्च केला आहे. तू अर्धे पैसे दे मग तुला घर देतो असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. यात दिलीप यांच्या डोकीवर प्लास्टिक पाईप मारल्याने दुखापत झाली. तसेच शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याबाबत दिलीप दळवी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार रामचंद्र शिवराम दळवी, यशवंत रामचंद्र दळवी व यशश्री यशवंत दळवी अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शैलेश कांबळे करीत आहेत.